गुरुवार, १९ जुलै, २०१२

शब्दखेळ


वचन देतो जीवना,
देणार मी जीव ना !

एक छोटी कामना, 
छंद लाभो, काम ना!

सच्चीच होती भावना, 
तू  दिला कां भाव ना?

जीवनी बहु यातना, 
सापडे सुख यात ना!

कैशी सुटावी वासना?
सर्वत्र  तिचा वास ना !! 

भार वाटे वेदना,
जाणिले मी वेद ना!

पुरती मला कल्पना  
आता पुढे कल्प ना !!! 


- श्रीधर जहागिरदार 
१७ जुलै २०१२ 

रविवार, १५ जुलै, २०१२

नव्हतो कधी आश्वस्त मी

असलो जरी ना ध्वस्त मी
नव्हतो कधी आश्वस्त मी !

धरतो तुला गृहीत, की 
करतो बहाणा,"व्यस्त मी".

खचल्या व्यथा माझ्या मनी 
म्हणुनीच राही मस्त मी! 

पळवून नेले दु:ख तू 
असतो सुखाने त्रस्त मी.

जगती यशाचे गोडवे
मग अंतरी का पस्त मी?

मजवीण ना दूजा रिपू
घालू  कुठेशी गस्त मी.



- श्रीधर जहागिरदार 
१५ जुलाई २०१२ 

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

सांजवेळी...

माझीच सावली, पुढे कां  धावली,
असावा श्रीहरी, वळणाशी...

विरलेत रंग, नुरलेत ढंग,
चित्ती झालो दंग, एक नामी...

पहाटेचे पक्षी, आभाळात नक्षी
दावतात  अक्षी, सांजवेळी...

संपलेत सारे, खटल्यांचे भारे,
अवधी नसावा, सुटकेला...

श्वासात भरले, गंध हे तिथले,
समईची ज्योत, प्रकाशली....       
  - श्रीधर जहागिरदार
१२ जुलाई २०१२  

म्हणावे कशाला...




धुंदी फुलाची गंधात आहे, आकार नाही म्हणावे कशाला?
गातात पक्षी बागेत माझ्या, सत्कार नाही म्हणावे कशाला?


माळून स्वप्ने येते मी डोळा, कां दंश व्हावा तुझ्या पापणीला?
दाबून पीडा जगते युगांची, चित्कार नाही म्हणावे कशाला?


सृष्टीत साऱ्या जरी भास त्याचे, करती तमाशा उगा शोधण्याचा
बांधून देऊळ देवास कोंडी, दिशांत दाही म्हणावे कशाला?

नाहीच जमले जरी आज काही, विषादास थारा देतो मनी ना
आशा उद्याची स्वप्नांत वाहे, नाहीच ग्वाही म्हणावे कशाला?





- श्रीधर जहागिरदार 

वर ढग डवरले

नको धीर सोडू पोरा 
सुगी नक्की यंदा घरा
'त्या'ने टाहो ऐकीयले, 
वर ढग डवरले...

वर ढग डवरले,
मन 'ही'चे  हरखले
मृदगंधाचे रांजण सारे 
तनावर ओसंडले...

तनावर ओसंडले
टप टप मोती ओले,
झिरपले खोल उरी 
बघ बीज अंकुरले...

बघ बीज अंकुरले
नभा कडे झेपावले,
सृजनाचे गीत गाण्या  
वर  ढग डवरले... 

- श्रीधर जहागिरदार 
१-७-२०१२ 


रविवार, २४ जून, २०१२

असला पाउस, तसला पाउस

शब्द  ओला, आला पाऊस
अर्थ चिंब  झाला पाऊस...
****************************
झिंगत पिंगत उनाड सोबत   
वारा घेऊन आला पाऊस,
तुझ्या रुपा अभिषेक कराया
छत्री उडवून गेला पाऊस ...
**********************************
गरम चहाच्या कपात टपटप  
टपरीखाली 'छत'वाला पाऊस, 
'एकछत्र'  हो डुलते प्रेमी,
रिझवी त्यांना मतवाला पाऊस...  
**********************************
घाटामधली वळणे शोधी, 
बोट बिलंदर झाला पाऊस,
गर्द तनुवर झिम झिम बरसे 
अधर कलंदर झाला पाऊस ...
*******************************
बरसून बरसून थकला आणि 
उन मोकळा झाला पाऊस,
कसा नभावर कमान तोलत 
रंग साजिरा झाला  पाऊस ...
***************************

दौरे काढून पळती अंबुद 
राजकारणी झाला पाऊस,
कधी हजेरी लावून निव्वळ
भत्ता खातो साला पाऊस ...
*********************************

ढग फुटीचे तांडव नाचत 
दहशत पेरून गेला पाऊस
आकाशातील बापा तुमचा  
कसा कसाबी झाला पाऊस? 
 *****************************

शब्दांची बुडबुड नुसती 
कुणा कवीची कविता पाऊस,
शेतकऱ्याच्या जीवास तगमग,
आस बने की फास हा पाऊस......
*******************************

- श्रीधर जहागिरदार 
8 मे 2012 




मंगळवार, ५ जून, २०१२

फूल मस्त रंगले

फूल मस्त रंगले, 
आपल्यात दंगले;
आसमंत गंधले
कळले नाही !

रानातून आत आत
देते मज वाट साद 
का अजून पाय तिथे 
वळले नाही ? 

पथिक उभा पाराशी
लगबग ती दाराशी ; 
गांवात पाय कधी 
रुळले नाही !

जीवनाने गांजले
तरी उगाच लांबले ;
मरणाचे एक बरे  
छळले नाही !

- श्रीधर जहागिरदार 
५-५-२०१२