शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

गझल तंत्र - एक शिंपी काम

चार घातले, पांच उसवले,
धाव दोरा, म्हणून भागले...

सरळच शिवण काफियाची,
ओढून ताणून आणायाची,
तरी म्हणे हे "ना काफी"
ह्या शिंप्याला नाही माफी!

चार घातले, पांच उसवले,
धाव दोरा, म्हणून भागले...

ट्रायल मध्येच शिंपी फसला,
दर्दी म्हणतो ढीला मतला,
आशयाची सिटींग नाही,
वृत्तामध्ये फिटिंग नाही...

चार घातले, पांच उसवले,
धाव दोरा, म्हणून भागले...

एक एक वीत करत
लांब तुमान गेलो कापत,
उरला रदीफ माझ्या हाती,
लाज तयाने झाकत नव्हती...

- श्रीधर जहागिरदार
(गझल हा अतिशय देखणा, आकर्षक आणि मनोहारी  काव्य-प्रकार. मात्र गझल लिहिणे सोपे नाही. हा काव्य प्रकार हाताळताना येणाऱ्या उद्विगनतेतून  ही विनोदी कविता लिहिली. )

२ टिप्पण्या:

  1. खूप आवडलीय. शिंप्याचा काँटेक्स्ट भन्नाट आहे.


    मी पण वैतागून असं काहीतरी लिहिलं होतं -

    एक शेर चंद्रावर एक मग समुद्रावर
    एक राज्यकर्त्यांवर एक 'तुझपे मरत्यां' वर

    एक शेर गाण्यावर एक दोन पाण्यावर
    एक पेपरांमधल्या रोजच्या कुटाण्यावर

    एक शेर साकीवर एक इष्कबाजीवर
    एक सख्त जळजळता सोवळ्या नमाजीवर

    शेवटी कुठे काही सापडेच ना जर तर
    एक खुद्द गझलेवर शेवटी कवाफीवर

    उत्तर द्याहटवा