गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

पसारा

घरात एक नवा माळा करून घेतलाय...

मला गरज वाटत नव्हती, 
पण हिचा हट्ट!

"काही लिहीत नसता हल्ली, तरी
पसरलेले असतात इथे तिथे, कुठेतरी
चंद्र तारे, वादळ वारे,
प्रेम-विरह, जुने कलह,
झुरता वसंत, फुलता हेमंत, 
मोराचं पीस, प्रेमाचा कीस,
काय आणि काय...


काहीही आणता कुठून कुठून
परवा उकीरड्यावरून
उचलून आणलत प्राक्तन,
त्या आधी तोतऱ्या नळाच
पेलाभर क्रंदन ...

शेजारचे गोरे आले होते शोधत
बायकोच्या गालावरची खळी,
तुम्ही पटकन झाकलीत तीवर 
आतून आणून पळी!

आजोबांच्या डोळ्यातला
ओला अंधार आणून
सुकवत बसलात कागदावर .
चार शब्द जाळून ..

असे कुणाचे काही बाही
उचलून घेऊन येता
कागदावर पेरून त्यांना
उगवेल  त्यावर जगता!!

उरलेले खरकटे
फेकूही  देत नाही,
म्हणे," असू दे, यमकास
कामी येतात हमखास."..

"अहो पायात येतात
येणाऱ्या जाणाऱ्याच्या!
.....कसनुस होत मला ...."

म्हणून मग...
घरात एक नवा माळा करून घेतलाय,
आता तिथेच असतो
सारा पसारा,
.
.
आणि मी..
.
.
हिचा हट्ट !!!

 -  श्रीधर जहागिरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा