रविवार, ८ मार्च, २००९

विदूषकमिरवत आलो चेहऱ्यावरती  चिरस्मिताचा शाप
जाळत आलो मनात आणि अश्रू  निष्पाप,

उरी हुंदका फुटता आले ओठावरती हसूं
किती कळा मी मनांतल्या मनांत रे सोसू।

घुमली जरी कानात  गझल दर्दभरी दिवाणी
फुलवत आलो सुरांमधुन मी सतत मधुर गाणी

कधी टोचला कांटा आणिं रक्तथेंब खुलला
म्हणू कितीदा गुलाब आहे सुंदर किती फुलला।

जरी वेदना असह्य झाली मारी कोलांट्या
स्वप्नाकांक्षा मनात जपल्या, ठरल्या वांझोट्या

गंमत म्हणुनी कथिल्या सर्वा साऱ्या  माझ्या व्यथा
रे विदूषकाचा जन्म कशास्तव दिलास मज तू वृथा।

- श्रीधर जहागिरदार 

रविवार, १ मार्च, २००९

जीवन वाटा

हुकल्या कितीक वाटा, चुकली जरी दिशाही,
आकाश तेच आहे, तोवर ना खंत काही।

हातात कोरलेल्या, आहेत दग्ध ज्वाला,
मी सूर्य रे अनादी, कां बाळगू तमा ही।

जख्मी हा मोर नादी झाला जरी खुशाल
जो पेटला पिसारा, विझणार ना कधीही।

झोकात झोकले मी जहराळ प्राक्तनाला,
फुटणार कांच प्याला, समजुन काय नाही।

चुकतील सूर थोड़े, गळतील पाकळ्याही,
गाण्यात या जिण्याच्या शोधून गंध पाही।