शुक्रवार, २५ मे, २०१२

ना तरी जमले पुन्हा


खोडले, लिहिले पुन्हा,
ना तरी जमले  पुन्हा ...

घाव ते उघडू नको    
कावळे टपले पुन्हा... 

दु:ख जे जपले उरी 
तेच कां लुटले पुन्हा? 

ध्वस्त ना झाली मने 
बांधती  इमले पुन्हा ... 

चोचले पुरवून ही 
मातले अपुले पुन्हा...  

भेटलो असतो शिवा, 
मोह ते अडले पुन्हा...

पावसा कर तृप्त तू 
मी धरा, नटले  पुन्हा...

भोगतो चुपचाप 'श्री',
चालती  खटले पुन्हा...

श्रीधर जहागिरदार 
२५.०५.२०१२   

बुधवार, १६ मे, २०१२

मारतो बाता पुन्हा...


भांडतो आता पुन्हा
जोडतो गाता पुन्हा...

युद्ध झाले रे सुरु 
कां रिता भाता पुन्हा?

द्रौपदी धोक्यात तू 
ना कुणी त्राता  पुन्हा ..

वादळांशी तो लढे 
मोडका छाता पुन्हा...

'कुंडले'  दे काढुनी 
पाहिला दाता पुन्हा?

आवरा "श्री"ला कुणी  
मारतो बाता पुन्हा...  

- श्रीधर जहागिरदार 
१६-०५-२०१२ 

मंगळवार, ८ मे, २०१२

जिंकण्याची जिद्द आहे..."जिंकण्याची जिद्द आहे! जिंकण्याची जिद्द आहे!
दाखवा कोठे रिपू, ते मारण्या मी सिद्ध आहे,"
जिंकण्याची जिद्द आहे?

गाठण्याला लक्ष्य त्याचे, धावला.. ठेचाळला, 
अडथळ्यांची रांग बघता जाहला तो क्रुद्ध आहे...    
जिंकण्याची जिद्द आहे?
सोडतो स्पर्धेत मागे, तोच  वाटे  शत्रू खरा,
आग आग काळजांत, तळमळे, मन विद्ध आहे...
जिंकण्याची जिद्द आहे?

क्लांत देह, जीव दमला, रिचवितो पेले किती 
'एक घेई होण्यास मार्गी', हरपली ती शुद्ध आहे...
जिंकण्याची जिद्द आहे?

जिंकण्या छोट्या लढाया, शील डावास लावीतो,   
संपते का मग कधी,  जे  चिरंतन युद्ध आहे ....  
जिंकण्याची जिद्द आहे?

झिंग चढता ती यशाची, कामिनी घे कवटाळूनी  
लिप्त तो कामात झाला, सोडीली ती हद्द आहे....   
जिंकण्याची जिद्द आहे?

षड रिपुंचे आव्हान जो, सहज परतुनी लावतो,
तोच रे रिपू दमन,  जाण तो तू खुद्द आहे.... 
जिंकण्याची जिद्द आहे!!

जिंकण्या आधी जगाला, जिंकले आहे स्वत:ला,
तोच केवळ बुद्ध आहे, जिंकण्याची जिद्द आहे! 
जिंकण्याची जिद्द आहे!! 

- श्रीधर जहागिरदार 
२ मे २०१२ 


शुक्रवार, ४ मे, २०१२

कवाड बंद खोलले


कवाड बंद खोलले
उगाच घाव सोलले... 

फुलातुनी मुके तरू,    
मनातलेच बोलले ... 

ऋतू फितूरसे तिथे,
इथे, तनात डोलले... 

खगास पंख लाभता,
नभास  उंच  तोलले ...

पहाट आज आळशी 
खळीत दंश डोलले...  

- श्रीधर जहागिरदार 
    ४-५-२०१२