सोमवार, २२ जून, २०१५

शब्द


 शब्द
***********
लिहिलेले शब्द,
पांढऱ्यावर काळे नसते,
असतात ते मेघ, आकाश व्यापलेले
कधी त्यांच्या उदरात सामावलेली
आर्द्रता समजून घे
आणि विरघळू दे स्वत:लाही नि:संकोचपणे …


 शब्द उद्गारलेले
नसतात वाऱ्यात सोडलेल्या लहरी,
सामावलेली असतात त्यात वादळे
मनातल्या अव्यक्त उद्रेकाची,
कधी तरी कानोसा घे
आणि भिड त्याला समोरा समोर …

अव्यक्त शब्दातली निरवता
तुझी सोय नसते, मुक्त व्यक्त होण्यासाठी
त्यातली दाहकता न विझवता
ऐक त्यातली आर्तता आणि दे हाक ….

अविरत चालणाऱ्या ह्या काल-वाहनात
करत आहोत प्रवास शेजारी बसून, तर
जोडून घेना नाते, मनाचे मनाशी …

२१ जून २०१५

गालगुच्चा


"तुझ्या कविता ऐकायला येतेय", असा 
तुझा निरोप आला कि मला हसूच यायचं
कारण तुझा आणि कवितेचा बादरायण संबंध नाही
हे मला ठाऊक होत
यायचीस आणि म्हणायचीस,
"चल  वही वगैरे काढून ठेव, तोवर मी भजी करायला घेते"
सारी तयारी बरोबर घेऊन आलेली असायचीस तू.
मी मनापासून वाचायचो कविता तुझ्यासाठी
एका पाठोपाठ एक …
मधून मधून भजी आणि वाफाळलेली कॉफी
तू मधून मधून दाद द्यायचीस
"वा ", " काय कल्पना आहे, पुन्हा वाच" …
"काय समजल ग तुला ह्या कवितेतल ?"
मी विचारल होत एकदा
तर म्हणालीस, "तू समजलास, तेव्हढी समज खूप झाली"
.
.
निरोपाच्या वेळी कवितांची वही तुला देऊ केली
तर म्हणालीस, "नको, कवितांचा गालगुच्चा नाही घेता येत !"
त्या नंतर त्या वहीतल्या कविता वाचल्या नाहीत,
 कधीच, कुठेही
कांद्याच्या भज्यांनाही कवितेची चव आली नाही कधी !!
- श्रीधर जहागिरदार