गुरुवार, ३१ मे, २०१८

कुरुक्षेत्र



जन्माला येताना आपसूकच आला
वारसाहक्काने मुठीत बंद होऊन
माझ्या हिश्श्याचा
एक तुकडा कुरुक्षेत्राचा ..

आणि झाला  सुरू 
महाभारताचा 
एकपात्री आजन्म प्रयोग !

- श्रीधर जहागिरदार 

बुधवार, १६ मे, २०१८

एक त्रस्त रिकामेपण



एक त्रस्त रिकामेपण 
त्यांत थेंब थेंब ठिबकणारा कंटाळा ... 
*
दुसरे काही करता येत नसल्याने
पहात बसतो  
वारा वाहेल तशी हलणारी नारळाची झावळी...  
तिच्यावरचा डोल कावळा 
वाऱ्याचा वेग वाढल्यावर उडतो 
आणि जाऊन बसतो सातव्या मजल्यावरच्या 
किचन खिडकीच्या ग्रिल वर 
आतून, खोल मनात पडून असलेलं शिळं पुण्यकर्म 
बाहेर पडतं; कावलेला कावळा सुखावतो ...

चोच पुसून उडतो, झेपावतो सातव्या मजल्यावरील 
लिविंगरूमच्या विंडो एसीच्या सावलीला 
आतला कलकलाट ऐकतो 
मालिकांच्या शिळ्या एपिसोडचा, आणि 
कावल्यासारखा कर्कश आवाज काढून 
उडून जातो माझ्या नजरेआड, 
मलाच जबाबदार धरल्यासारखा !  

दहाव्या फ्लोअरच्या  वळचणीला एक कबूतर जोडी 
निसर्ग नियमाने गुटर्गु गुटर्गूत मश्गूल 

रणरणत्या उन्हात वेगाने 
कर्कश्य आवाज करत शेजारच्या हॉस्पिटलशी 
आलेली ऍम्ब्युलन्स, आज एवढ्यातच तिसऱ्यांदा ...  

"hallo मोटो" चा गजर वाजतो विरंगुळ्याला 
"सर मैं, बेजान बिमा कंपनी से बोल रही हूं ... "
आजचा कंटाळा उगाच अस्वस्थ झालेला
एम्बुलन्स च्या कर्ण्याने ...  नाकारतो 
नेहमीच्या १५ मिनिटांच्या विरंगुळ्याची संधी,
आणि सुनावतो त्या मधुरेला
 " उम्र ने कर दिया यूं निकम्मा
कोई दरकार नहीं रखता बिमा  "
मी मोकळा करतो,  
म्यूट मुळे गुळणी धरून बसलेला टीव्ही, 
तर तेच ते "मैंने, मैं, मैंने" आणि त्या फटकेबाजीवर
साऱ्या त्रस्त समंधांचे भाष्य 
एकमेकांच्या नरडीचा घोट घेतल्यासारखे .... 
*
ठरलेल्या वेळी येतो चहा आणि खारी  
सोबत पिशवी, सामानाची यादी आणि पैसे 
वर ताकीद " ते भाजणीचं पीठ न विसरता आणा  
आणि हो आज फुंकू नका... 
मिळेल  तुमचा वेळ तुम्हाला, 
काही तरी लिहावाचायला... "

कधी कधी अँब्युलन्स शांतपणे 
धावते ... समजूतदार होऊन !!!

- श्रीधर जहागिरदार
१४-०५-२०१८
"नुपूर" जुहू स्कीम