शुक्रवार, २२ मे, २०२०

उंदीरआज जुने पेपर विकले ... 

तशी चणचण नव्हती 
पण छोट्या नोटेची किंमत 
चांगलीच कळली होती  

गोळा केले, 
इकडे तिकडे विखुरलेले 
कपटे चिपटे खंगलेल्या शब्दांचे,
पिवळे पडलेले लिफाफे 
साभार परतलेल्या कवितांचे, 
 
भर पाडली त्यात 
काढलेल्या नोंदींची, 
उरकलेल्या कार्यशाळांसाठी;
हिने सुद्धा आणून दिली 
शंभर रेसिपींची शिजत पडलेली वही 
वाटलं आता तरी येईल वजन सही 
पण कमीच पडले ते ३५० ग्राम ने ... 

अचानक आठवली  
दोन पुस्तके :अर्थशास्त्र आणि वित्तीय प्रबंधनाची 
उंदीर शिरला होता एकदा घरात 
त्याने कुर्तडलेली 
दडवून ठेवलेली पत्र्याच्या पेटीत ! , 

त्यांना मिळून भरली रद्दी १० किलो (एकदाची)

भंगारवाल्याने काढून नोटा खिशातून 
ठेवली हातावर माझ्या शंभराची एक नोट निवडून 

माझी नजर पडली 
त्याच्या हातातल्या विशिष्ट नोटांवर, 
विचारले मी त्याला 
" काय रे, ह्याही घेतोस का रद्दीत ?" 
तर हसला केविलवाणा, 
म्हणाला 
"नही साब, धंदे में सब जुगाड करना पडता है 
 पेट तो चुहे को भी हर रोज भरना पडता है" 

- श्रीधर जहागिरदार 
नोव्हेंबर २०१६

गुरुवार, ७ मे, २०२०

बोधिवृक्ष


कुठे सापडेल मला बोधीवृक्ष?
मैलोगणती पायपीट करुनही
मनाला कापून काढणारा
हा प्रश्र्न नेमकं काय सुचवतो?
मी नेमकं काय शोधतोय?
कां शोधतोय?
बुद्ध की बोधीवृक्ष?
बुद्ध म्हणून बोधीवृक्ष?
की बोधीवृक्ष म्हणून बुद्ध?
उरात कुऱ्हाड बाळगून
बोधीवृक्ष शोधणारा मी...
मी उरात कुऱ्हाड कां बाळगून असतो?
बोधिवृक्ष कुऱ्हाडीला घाबरत नसणार ...
मलाच कदाचित भय वाटत असणार बोधिवृक्षाचं ...
सापडलाच आणि कुऱ्हाडीच्या दांड्याला
फुटल्या फांद्या बोधिवृक्षाच्या तर?

नाही, मला अंगुलीमाल व्हायचं नाही!!
ती बोधिवृक्षातील धि सुधारुन घेतली,
एवढी ज्ञानप्राप्ति खूप झाली.
- श्रीधर जहागिरदार
७ में २०२०

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

तो जो टपून बसलाय

तो जो टपून बसलाय
तो कावळा आहे की गिधाड
यावरुन ते वाद घालताहेत ...

तो जो टपून बसलाय
तो कावळा आहे की गिधाड हे खुद्द त्यालाही माहीत नाही, मात्र
तो कां आहे हे त्याला पूर्णपणे ज्ञात आहे,

ते जे वाद घालताहेत
ते नेमके कां आहेत हेच त्यांना उमगलेले नाही,
त्यांचे वाद सुरुच असतात.

वाद घालताना ते पुरावे मागतात
तो कावळा असण्याचे किंवा
तो गिधाड असल्याचे,
मग तेच रुप धरुन दाखवतात कावळ्याचे आणि गिधाडाचे
पुरावा म्हणून

तो जो टपून बसलाय
आपले कार्य सिद्ध होताच
तो झेपावतो ....

- श्रीधर जहागिरदार
१० एप्रिल २०२०
(करोना पर्व)

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

गजरा


पहाटे
एकमेकासोबत
गरम वाफाळलेला
चहा घोट घोट,
सोबतीला चिवचिवाट
पहाट चोचीत घेऊन
दिवसाला कवेत घ्यायला
निघायच्या तयारीत असणाऱ्या पाखरांचा ….

संध्याकाळी
थकल्या प्रतीक्षेला माळावा गजरा
मंद गंध मोगऱ्याचा
आणि करावे - व्हावे टवटवीत
असे काहीसे असायचे मनात ….

राहूनच गेले सारे
अधिक महत्वाच्या
ऐहिक सुखांच्या शोधात

- श्रीधर जहागिरदार

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

अटॅक

अटॅक कधीही यायचा
मग आवडती पुस्तके
टिपण वह्या
कविता
मित्रांमध्ये वाटून द्यायचा ...

एकदा तर
एक कविताच
एका मित्राचं नांव लिहून
त्याला दिलेली.
दोघांचं भलं झालं.

आता
पुस्तके नावडती झालीत
वह्या कोरड्या पडल्यात
कविता हरवल्यात

आता अटॅक आला तर
चौकटीतून डोकावणाऱ्या
मित्रांना सांगणार
मलाच चौकटीत ओढून घ्या ...

- श्रीधर जहागिरदार
१८-०२-२०२०