मंगळवार, ६ मार्च, २०१८

जाणीव



अथांग झाल्या डोह मनावर
होडी बनुनी शैशव माझे 
कधी हळहळते, कधी डुचमळते
तरंग उठवित जलपृष्ठावर 
अथांगतेला मर्यादांची 
अलगद जाणीव देते !

सोमवार, ५ मार्च, २०१८

मी मौन पाळले होते


मी मौन पाळले होते
*****************

तू सत्य गाळले होते 
मी मौन पाळले होते...

रात्रीच येत सामोरे  
जे प्रश्ण टाळले होते...

संपूर्ण वाचले कोणी  
संदर्भ चाळले होते....

प्रारब्ध मांडले जेथे   
ते पर्ण वाळले होते ....

पुष्पें नकोस तू शोधू    
मी दु:ख माळले होते... 

हा गंध कोठुनी आला ? 
ते पत्र जाळले होते !

झालीच 'झाड' तू जेंव्हा  
'हे' भूत भाळले होते !

- श्रीधर जहागिरदार 
०६-०३-२०१८