गुरुवार, २६ जुलै, २०१८

नेमका मी आहे कुठे?

नेमका मी आहे कुठे?
मी प्रवाही झालो कुठे !

सोडल्या मी वाटा जुन्या 
पण नव्याने जाऊ कुठे? 

पाखरांचा उडला थवा
झाड गाते शोधू कुठे? 

दु:ख गेले हरखून.. मी
आसवांना वळवू कुठे?

धाक ठेवी, शिस्तीत जी  
ती मुठीची काठी कुठे? 

आठवावी आई मला
शोधताना लाडू कुठे !

जात माझी 'माणूस' हे 
सांगणारा नाही कुठे !

- श्रीधर जहागिरदार 
२६ जुलै २०१८

सोमवार, २३ जुलै, २०१८

पाऊस आहे

मनाच्या सांदीत गोळा पाऊस आहे 
तरीही शब्दांत कोरा पाऊस आहे...

घराला वेढून असता पाणी पुराचे 
कसे मी सांगू जरासा पाऊस आहे ?

नको राखू चालताना खोटा दुरावा   
जरा सच्चे वाग आता,पाऊस आहे... 

असे वणवा ठासलेला अफवेत एका 
जळू द्या रे! सांत्वनाला पाऊस आहे...   

बघा, ज्यांनी पेरले रस्त्यातून खड्डे   
अहवाल त्यांचा सांगतो पाऊस आहे !

तयारी सारीच केली होती यमाने  
म्हणे रेडा,येत नाही! पाऊस आहे...

  - श्रीधर जहागिरदार 
२३ जुलै २०१८