शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

परिघ



एकदा सहज विचारल चंद्राला,
अमावस्या- पौर्णिमा, पौर्णिमा- अमावस्या करुन
कंटाळा येत नाही का तुला?
"काय करणार मग ?",
तो उत्तरला:
"काळतोंड्या म्हणुन चिडवतात अवसेला,
कलेकलेने म्हणुन करतो
मी पुनवेचा प्रवास;
वाटतं पुनवेला तरी धन्य पावेन मी ...
पण टिपुर चांदण्यातही दिसतात यांना
फक्त डाग जुन्या अवसेचे,
अन कलंक्या म्हणतात मला।
मावळतिच्या चाकावरुन परत फिरतो
मी अवसेच्या प्रवासाला!"

बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९

मागणे



एवढा प्रकाश हे स्वयंप्रकाशी, मी
कधीच मागितला नाही तुझ्यापाशी;
मागितला असेल कधी जरासा,
अंतर्मनाचा वेध घेणारा एक कवडसा।
कदाचित एक काजवा
निबिडारण्याची भीती चीरण्यासाठी;
किंवा एक टिमटिमणारा दिवा
ऐलपैल सांधण्यासाठी।
पण येवढा?
सार्या अस्तित्वाला गुदमरवणारा?
कधीच नाही,
सूर्यालाही आंधळा करणारा ।

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

पराभव





माझ्या पराभवाचा सत्कार आज आहे,
येणार वेदनेला आकार आज आहे...

आकाश जिंकल्याचा केला किती बहाणा,
कळले परि मनाला तो व्यर्थ माज आहे...

मृगजळात जल्लोषाच्या वाहून दूर गेलो,
पण मोल आसवांचे कळणार आज आहे...

किती वाजल्या दुन्दुभी, किती गाजले नगारे,
आता वेदनेतून सजणार साज आहे....

त्यांना हवे म्हणुनी फाटून ओठ हासे,
ह्या बेगडी जिण्याचा फुटणार ताज आहे...

मी जाहलो जगाचा, न राहिलो स्वता:चा, 
माझा फिरून मजला कळणार बाज आहे ...

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

दोन कणिका



अंधार चिरायला,
पुरे असतो एक काजवा ;
जीव जाळायला
खूप होतों अश्रु हळवा।

माझं रडणार दु:ख 
निजलय 
घेउन अफूची गोळी,
एका अंगाई अभावी।

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

धुक्याच्या वयात


धुक्याच्या वयात,
मनात खुलतात, बाहेर फुलतात, फक्त गर्द गुलमोहर,
तप्त ऊन, बाभुळ काटे, सारे सारे, सारे मनोहर।

धुक्याच्या वयात,
दिवस देखील रात्र होतो, मनाकाठी, स्वप्नासाठी,
किती किती फुले फुलतात हुरहुरत्या गंधापाठी।

धुक्याच्या वयात,
हरपते भान, उरते तान, सुर भारला आणि गळा 
नाते तुटते, जमीन सुटते, आकाश भोर फक्त झुला।

धुक्याच्या वयात,
माझे असे काहीच नाही, सारे सारे तुझ्यासाठी,
प्रचंड असा विश्वास माझा, माझे आकाश माझ्यापाठी।

धुक्याच्या वयात, 
निःशब्द नीळे, निर्मळ तळे, सर्वदूर पसरून असते,
सारे स्वच्छ पारदर्शक, कुठे कुठे धुके नसते।

- श्रीधर जहागिरदार