ठरवून केले वार मागुनी दिले खुलासे जाता जाता,
लढण्याला मी समर्थ आहे, नको दिलासे जाता जाता...
रमलो येथे रसिकागत मी, खुल्या दिलाने दाद दिली,
गळ्यातुनी निघतील अचानक सूर जरासे जाता जाता...
अपराधाचे ओझे ओढत उभा जन्म मी जळलो आहे,
दिलीस माफी जरी कधी ना, ऐक खुलासे जाता जाता...
किती बुडबुडे शब्दांचे मी उडवत फिरलो ठायी ठायी,
निरर्थकाचा अर्थ गवसला, उगाच भासे जाता जाता...
गृहीत धरुनी तुला वागलो तरी न मजला बोल दिला,
सहवासाचा गंध तुझ्या मज मनी विलासे जाता जाता...
अज्ञाताचे भय कातरसे, "श्री" अंधाराच्या कुशीत शिरला,
मिटले डोळे उघड जरा बघ प्रकाश हासे जाता जाता...
- श्रीधर जहागिरदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा