गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

जरा वेगळे वाटते...

खोल आत दाटलेले, पण कधी न आटलेले,
क्षणांत ये उफाळूनी, घे मना कवटाळूनी, 
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते... 

पुस्तकांत मिटलेले, होते जरी तुटलेले,
मोरपीस आठवतो, गीत खुळे आळवतो,
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते...  

रोज रोज जी हुजुरी, खळगीसाठी ही मजुरी,
परिवारात करतो मजा, सहज टाकुन मी रजा,
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते...

निमुटपणे हर वारी, भ्रष्ट बघतो कारभारी,
दिली घोषणा 
दणक्यात,उभा राहून घोळक्यात 
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते... 

तू असता माहेरास, विसरतो हमखास, 
त्या सुचना साठवून,पाळतो मी आठवून
जगताना त्या क्षणास,जरा वेगळे वाटते... 
जुनी भेट स्मरताना, हात तुझा धरताना, 
सहज घातला डोळा, CCD तील ललनेला, 
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते... 

- श्रीधर जहागिरदार 
   १५.०२.२०१२ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा