मंगळवार, ६ मार्च, २०१२

तू असावे ...

झुंजून येता कधी वादळाशी, किनारा बनुनी तिथे तू असावे 

अंधारवाटा अशा जीवघेण्या, देण्या सहारा इथे तू असावे...


संपेल कैसी तुझी रे ही दैना, मनातून केले तुला हद्दपार, 

दंग्यात ठरते तुझे नामधाम, मंदिर मस्जिद कुठे तू असावे... 


"ओठात आली नवी क्रांतीगीते, पुनः पेटणार मशाली नव्याने" 

होणार शामिल नक्की तुला रे, मागून येतो पुढे तू असावे...


गल्लीत दंगे निवळले जरी, निखारे मनातील कसे ते विझावे 

भाऊच व्हावे वैरी जीवाचे असे पाडले तीढे तू असावे... 


फेडीत देणे जुन्या ह्या दिशांचे शोधीत तारा "श्री" भटके अजून, 


संकेत दिसतो असा जीवनाचा, जिथे नसे मी तिथे तू असावे...


- श्रीधर जहागिरदार 

२५.०२.२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा