तुला जाणीले पहिल्यांदा मी रानाच्या काठी,
खुशाल होता झुलत कोवळ्या पानाच्या देठी...
कां नाकारू, भय अनामिक जळात थरथरले ,
रान पांखरू माथ्यावरुनी होते भिरभिरले....
वणवण फिरलो शोधण्यास मी माझा ध्रुव तारा,
क्षणभर देखील तुझ्या विचारा दिला न मी थारा...
किती तुडवल्या रानोरानी नंतर बाभूळ वाटा,
कधी घडविल्या रक्त सिंचुनी नवीन पाऊल वाटा...
अंतरातले किती किनारे वादळ साहून पुरले,
ऊर फाटले दर्याचे पण शिबाड शाबूत उरले,
अटळ सावली परि तुझी ही नभ व्यापून उरली,
शिशिरामधली पानगळी कां वसंतात स्मरली...
दिसे अता मज रानामधला डोह चांदणे प्याला,
जरा विसावा घे .. नभातून मला इशारा आला...
- श्रीधर जहागिरदार
२६.०३.२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा