कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रुजते, कुठेही हसते!
बाल्कनीच्या कुंडी मधले
फूल बनुनी कधी उमलते;
खिडकी मधले नभ चौकोनी
चांदवताना, तिथे उमगते;
कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रमते, कुठेही जमते!
कधी बटेच्या हिंदोळ्यावर
झुलता झुलता अलगद पडते,
गालावरती खुलता खुलता
लाजत लाजत खळीत दडते.
कवितेची एक ओळ सावळी,
अशी हरखते, अशी मुरकते !
कूर्म गतीच्या रांगेमध्ये
वीज गतीने मनी चमकते,
रेटारेटीत लोकल मधल्या
गुंजन अल्लड कानी करते,
कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रुजते, कुठेही ठसते!
बाजारी ती शृंगाराच्या
केविलवाणी पदी थिरकते;
आजारी वृद्धांच्या नयनी
कातर, एकाकी थरथरते
कवितेची एक ओळ कावरी,
कधी सरकते,कधी थबकते!
भीक मागते हात कोवळे
रस्त्यावरती, मन चुटपुटते;
दंगे, हत्या, पेपरातुनी
वाचत असता, मन पुटपुटते;
कवितेची एक ओळ मनस्वी
कुठेही दिसते, कुठेही असते !
भेट अचानक: "किती वर्षांनी?
असतोस कोठे ? आहे कां स्मरते?
कशा चालल्या तुझ्या कविता?
ह्यांना नेहमी सांगत असते"
कवितेची एक ओळ पुराणी
खुदकन हसते, मनात सलते!!
कवितेची एक ओळ पोरकी
अर्था मुकते, वहीत सुकते !!
- श्रीधर जहागिरदार
१२.०३.२०१२.
अप्रतिम
उत्तर द्याहटवा