गुरुवार, १९ जुलै, २०१२

मुखवट्याची आरोळी

1  
मुखवट्याच्या बाजारात
चेहरा आता वटत नाही,
माल एकदम अस्सल आहें
सांगितले तरी पटत नाही.

2. 
मुखवट्याच्या बाहेर
लढत असतो जगाशी,
मुखवट्याच्या आत
झटत असतो स्वत:शी !

3. 
चेहरा? शाबूत आहें.
मुखवटा? काबूत आहें.
बेधडक घे उडी तू,
इरादा मजबूत आहें.


4.
चेहरा रुजला कधी ना,
मुखवटा सजला कधी ना,
आयुष्य वैराण झाले
शिंपले त्याला कधी ना ...

5. 
"चेहरा हिरमुसला कशाने 
आज हा कां दुखवटा?"  
"ओरबाडून गेले  कुणी 
 आज त्याचा मुखवटा..." 

6, 
घामाने डबडबला
चेहरा गुदमरलेला,
रुमाल काढून मात्र
मुखवटाच पुसलेला...

7,
असे कसे बीज, देवा
करू कसे  कवतिक  
पेरला चेहरा, हाती
मुखवट्याचे पीक. 


8.
दहा दिवस शोक पाळायचा
तर हवाच मुखवटा,
खरा चेहरा दिसला तर 
कसा समजेल दुखवटा 

9.
इतक्या वर्षांनंतर आता
दिसला एक खवटा,
तुमचाही नव्हताच चेहरा,
होता एक मुखवटा!

10.
सहज जमते आता
दाखवायला दुखवटा,
बाजारातून आणलाय
एक तयार मुखवटा ..


11.
भाळलीस मुखवट्यावर
हा आहें तुझा दोष,
आता का मग असतो 
माझ्या  चेहऱ्यावर रोष?

12.

देश किती धुंडाळले,पाहिली गावे किती, 
माणसांची रूपे अनेक,वेगळ्या चालीरिती,
चेहरे दिसलेच नाही, मी  मुखवटे पाहिले, 
नाटक्यांच्या प्रदेशी, जगणेच बाकी राहिले..... 

- श्रीधर जहागिरदार 'आरोळी' 

गीत - शोध माझ्या फुला तू


शोध माझ्या फुला तू, गंध प्रीतीतला ...
प्रीत फुलली मनी हे कां कळेना तुला.... 
लाजते  ... बोलते ... बोलता लाजते. ...
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना तुला.... 

तू मनी  कोंदणी, हरघडी हर क्षणी,
वाट पाही, शिणे, बघ  इथे  पापणी....
बावरे, सावरे,  भेटता तू मला.
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना  तुला....  

आज रे हासला बघ कसा मोगरा      
सांगतो गुज तुला, गंध त्याचा खुळा, 
माळ ना, साजणा, साद देतो तुला 
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना  तुला....

- श्रीधर जहागिरदार 


शब्दखेळ


वचन देतो जीवना,
देणार मी जीव ना !

एक छोटी कामना, 
छंद लाभो, काम ना!

सच्चीच होती भावना, 
तू  दिला कां भाव ना?

जीवनी बहु यातना, 
सापडे सुख यात ना!

कैशी सुटावी वासना?
सर्वत्र  तिचा वास ना !! 

भार वाटे वेदना,
जाणिले मी वेद ना!

पुरती मला कल्पना  
आता पुढे कल्प ना !!! 


- श्रीधर जहागिरदार 
१७ जुलै २०१२ 

रविवार, १५ जुलै, २०१२

नव्हतो कधी आश्वस्त मी

असलो जरी ना ध्वस्त मी
नव्हतो कधी आश्वस्त मी !

धरतो तुला गृहीत, की 
करतो बहाणा,"व्यस्त मी".

खचल्या व्यथा माझ्या मनी 
म्हणुनीच राही मस्त मी! 

पळवून नेले दु:ख तू 
असतो सुखाने त्रस्त मी.

जगती यशाचे गोडवे
मग अंतरी का पस्त मी?

मजवीण ना दूजा रिपू
घालू  कुठेशी गस्त मी.- श्रीधर जहागिरदार 
१५ जुलाई २०१२ 

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

सांजवेळी...

माझीच सावली, पुढे कां  धावली,
असावा श्रीहरी, वळणाशी...

विरलेत रंग, नुरलेत ढंग,
चित्ती झालो दंग, एक नामी...

पहाटेचे पक्षी, आभाळात नक्षी
दावतात  अक्षी, सांजवेळी...

संपलेत सारे, खटल्यांचे भारे,
अवधी नसावा, सुटकेला...

श्वासात भरले, गंध हे तिथले,
समईची ज्योत, प्रकाशली....       
  - श्रीधर जहागिरदार
१२ जुलाई २०१२  

म्हणावे कशाला...
धुंदी फुलाची गंधात आहे, आकार नाही म्हणावे कशाला?
गातात पक्षी बागेत माझ्या, सत्कार नाही म्हणावे कशाला?


माळून स्वप्ने येते मी डोळा, कां दंश व्हावा तुझ्या पापणीला?
दाबून पीडा जगते युगांची, चित्कार नाही म्हणावे कशाला?


सृष्टीत साऱ्या जरी भास त्याचे, करती तमाशा उगा शोधण्याचा
बांधून देऊळ देवास कोंडी, दिशांत दाही म्हणावे कशाला?

नाहीच जमले जरी आज काही, विषादास थारा देतो मनी ना
आशा उद्याची स्वप्नांत वाहे, नाहीच ग्वाही म्हणावे कशाला?

- श्रीधर जहागिरदार 

वर ढग डवरले

नको धीर सोडू पोरा 
सुगी नक्की यंदा घरा
'त्या'ने टाहो ऐकीयले, 
वर ढग डवरले...

वर ढग डवरले,
मन 'ही'चे  हरखले
मृदगंधाचे रांजण सारे 
तनावर ओसंडले...

तनावर ओसंडले
टप टप मोती ओले,
झिरपले खोल उरी 
बघ बीज अंकुरले...

बघ बीज अंकुरले
नभा कडे झेपावले,
सृजनाचे गीत गाण्या  
वर  ढग डवरले... 

- श्रीधर जहागिरदार 
१-७-२०१२