खेळ
*****
गोळा करून, सांभाळून ठेवल्या आहेत
त्याने अनेक फिरक्या; लहान, मोठ्या,
वेळ येईल तशा वापरायला
जसे
माझ्या अंधार वाटेत अडकून चाचपडत असते
तेंव्हा वाटच पाहत असल्यासारखा
तो सरसावतो… पटवून द्यायला
कि तोच तेव्हढा आहे हितचिंतक माझा
ह्या आक्राळविक्राळ जगात
मला सांभाळणारा ….
आणि
हेहि की त्याच्याच हातात आहे
माझी जात धर्म अब्रू सुरक्षित
मग
प्रकाशाच्या अभावात
बघता बघता घट्ट पिळू लागतो तो
काही फिरक्या हळूहळू,सावकाश
प्रकाशासाठी मी आसुसताना …
मला ठाऊक असतं
हा फक्त एक खेळ आहे त्याच्या आवडीचा
पण तरीही मी पुन्हा पुन्हा बनून राहते एक बाहुली
उचलल कि डोळे उघडणारी,निजवल कि डोळे मिटणारी
तो खेळत राहतो मग बाहुलीशी…
आणि मीही बनून जाते एक बाहुली
समजून उमजून ….
अनुवाद : श्रीधर जहागिरदार
मूळ हिंदी कविता : आभा निवसरकर मोंढे