सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

मी जन्माला घालत नाही तिला …मी जन्माला घालत नाही तिला …

कधी प्रसवलेच माझ्या
निसर्गदत्त संवेदनांचे परिणाम
तिच्या रुपात
तरी उनाड हमरस्त्यावर
जाऊ देत नाही तिला .
तिची माप काढायला
दबा धरून बसलेले असतात
स्वयंघोषित नैतिकतेचे पहारेकरी
कंपू कंपूने,
कुणी त्याच त्या वर्तुळाला
घट्ट धरून बसणाऱ्या वृत्तीचे,
काही कमी अधिक मात्रेत छंदी वृत्तीचे  
हरेक रस्त्याचे विकट मालक …
चालवून घेत नाहीत ते
तिचे अवखळ, निरागस बागडणे,
आपल्यातच रमलेले
एका वेगळ्याच वाटेवरचे ;

सर्व समावेशक, सहिष्णू संस्कृतीचा
टेंभा मिरवणारे
त्यांनीच आखून दिलेल्या वळणांनी,
त्यांच्याच पट्टीने मोजलेल्या
आभूषणवस्त्रांनी आलंकृत,
त्यांनी ठरवलेल्या साच्यातून
तिने चालावे रस्त्यावरून
असा 'फतवा'  काढतात
दोष त्यांचा नाही
सौंदर्योपासक आहेत ते …
आणि ती जन्मजात विरुपतेने नटलेली
मनस्विनी !!
सापडेल तिलाही सामावून घेणारा 
एक सर्व समावेशक प्रवाह,
तेंव्हा
अलगद मोकळे करीन तिला ओंजळीतून,
प्रवाही होण्यासाठी
तोवर
आवरावाच लागेल अनावर मोह,
तिला मिरवण्याचा माझ्या ओळखीसह  
- श्रीधर जहागिरदार 
२२-१२-२०१४