'जीवन' लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
'जीवन' लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २४ जुलै, २०१४

नाते



होडीस ना कळावे डोहास काय छळते
स्थितप्रज्ञ शांत वरुनी अंतस्थ काय सलते …

वाऱ्यास का नसावा थारा कुठे जरासा
प्रश्नास ह्या धरुनी हलकेच पान हलते …

"स्पर्शेन आज नक्की " विश्वास ये कुठूनी
आकाश शोधण्याला खग रोज उंच उडते …

लाभे खरा ज्वलंत प्राणातला निखारा
श्वासातले धुमारे जपण्यात वेळ खपते ….

मातीत राख विरता उमलून फूल यावे
डोहास थेंब सांगे "नाते असेच असते  "…


- श्रीधर जहागिरदार
२४ जुलै २०१४

गुरुवार, १२ जून, २०१४

प्रेषित




त्याचं  'नुसत' असण
सहन होत नाही त्यांना
कारण त्यांना घेता येत नाही
निर्णय …त्याच्या  स्थानापन्नतेचा (म्हणे !)
खर तर अंदाज  त्याच्या विपन्नतेचा …
प्रथम दर्शनी न्याहाळतात
त्याच्या "नुसते" पणा भोवतीचे
पोषाखी आवरण:
निमुळत्या लेंग्याचे आखूडपण /
धोतराच्या सोग्याची लांबी /
सदऱ्याच्या  कापडाचा पोत,
कपाळावरील टिक्याचा रंग, आकार, ठिकाण
आणि मांडतात आडाखे
त्याच्या सभ्यता-संस्कृती चे
आणि परस्पर ठरवतात कळप त्याचा !
कळपाविना 'नुसतं' असण
मान्य कां नसाव यांना ?
कळप- निरपेक्ष स्वागताचे वाण
बसत नाही त्यांच्या स्वागत यंत्रणेत ….
 ३
हळूच विचारतात नांव,
आडा सकट !
नुसत्या पोहरयावरून
समजत नाही त्याचं नेमकं पाणी….
आणि मग ते निश्चित करतात
मनातल्या मनात त्याच्या विचारांचा घाट,
तो  काही बोलण्याआधीच !
खड्ग परजायचं कि फूल सजवायचं
हे ठरवायचं असत त्यांना,
काही ऐकण्या आधीच !!
आणि
शोधत रहातात काही भौगोलिक संदर्भ
त्याच्या घामाच्या दर्पातून, वस्त्र मालिन्यातून
दगडा काट्यांनी सोलपटलेल्या
अनवाणी पायातून ठिबकणाऱ्या रक्त थेंबातून,
'नुसत्या' जखमांनी मन द्रवत नाही त्यांच, 
जिवंत ठेवलेले असतात त्यांनी मनांत
बरबटलेले शिलालेख संस्कृतीच्या नांवाखाली,
उपचारासाठी संदर्भ वापरतात त्यांचे … 
आणि चिरंजीव होते
शतकांच्या विषाणूंनी ग्रस्त
त्याची  जखम  !!
काहीही मान्य करण्याआधी
तो  असावाच लागतो त्यांच्या सारखा
त्यांच्या तोलाचा , त्यांच्या मोलाचा
म्हणून त्यांच्या घराच्या ओसरीवर
निवांत टेकलेला तो विपन्न फकीर
हाकलून लावतात ते …
आणि तो दिसेनासा झाला
कि करतात स्थानापन्न
आलिशान महालात सिंहासनावर
स्वर्णाभूषणांनी मढवून  त्याची प्रतिमा
आरती ओवाळायला !!!


- श्रीधर जहागिरदार
१२-०६-२०१४

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

तहान

 
 




वाळवंटात खूप मागे राहिलेला
एक म्हातारा सुरकुतलेला ....

उमेदीत खणलेल्या
त्याने जिवंत विहिरी,
आणि रचलेले
उत्तुंग गिरी ....

आताशा तहानला 

कि टिपतो
कड़ा ओलावलेल्या
आणि जपतो
सावल्या सांजभावल्या
मध्यान्हीच्या एकांत सूर्याला रिझवण्यासाठी

मृगजळ उमगायला 

आयुष्य थिट पड़ाव ना ?

- श्रीधर जहागिरदार 
१२-०४-२०१४ 

सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

निवारा




खळखळाट आयुष्याचा
स्तब्ध  उभा मी काठी,
जे मेघ बरसुनी गेले
ते नव्हते माझ्या साठी ...

अनभिज्ञ असा मी फिरलो
अज्ञातशा वाटेवरती,
आरूढ होऊनी तगलो
प्रश्नांच्या लाटेवरती ....

सत्यास शोधता रानी
डोहातुन साद मिळाली,
मी हात तयाला देता
मज खेचून आत निमाली ...

तो एकची आहे कुंड
ज्याच्यात मिसळती धारा,
थकलेल्या या गात्रांना
झुळझुळता गार निवारा...


- श्रीधर जहागिरदार
 ४-१२-२०१२

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

येईल एक होडी



आता आठवणींचे खण उघडायला मिळते सवड!

सापडतात सांदी कोपऱ्यात दडलेल्या काही खुणा, 
जुने फोटो, काही पत्र, धुळीने माखलेला मौउथ ऑर्गन..
आणि एक विस्कटलेली वही कवितांची....
प्रत्येक वस्तूभोवती गुंता पागल भावनांचा, आणि 
इतिहास घडल्या, बिघडल्या आणि अवघडल्या क्षणांचा
झरझर सरकतो डोळ्यांपुढून.
व्यवहार दक्ष, कर्तव्य दक्ष, सामाजिक प्रतिमा दक्ष.
दक्ष, दक्ष, दक्ष.. कौटुंबिक सुरक्षा हेच लक्ष्य!
कसा गेला त्या नंतरचा काळ, कळलेच नाही..

आता जो तो आपल्यात दंग, अन मी
पाण्यात पाय सोडून बसलेला,
ऐल तीरावरच्या आठवणी चघळत,
पैल तीर न्याहाळत.
येईल एक होडी अलगद 
माझ्या नावाचे शीड फडकावत 
नावाडी नसलेली. 
तोवर, असू दे, शब्दांचे हे तुकडे हाताशी,
जाईल वेळ बरा, 
कलिडिओस्कोप मध्ये टाकल्यावर ..