शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

येईल एक होडी



आता आठवणींचे खण उघडायला मिळते सवड!

सापडतात सांदी कोपऱ्यात दडलेल्या काही खुणा, 
जुने फोटो, काही पत्र, धुळीने माखलेला मौउथ ऑर्गन..
आणि एक विस्कटलेली वही कवितांची....
प्रत्येक वस्तूभोवती गुंता पागल भावनांचा, आणि 
इतिहास घडल्या, बिघडल्या आणि अवघडल्या क्षणांचा
झरझर सरकतो डोळ्यांपुढून.
व्यवहार दक्ष, कर्तव्य दक्ष, सामाजिक प्रतिमा दक्ष.
दक्ष, दक्ष, दक्ष.. कौटुंबिक सुरक्षा हेच लक्ष्य!
कसा गेला त्या नंतरचा काळ, कळलेच नाही..

आता जो तो आपल्यात दंग, अन मी
पाण्यात पाय सोडून बसलेला,
ऐल तीरावरच्या आठवणी चघळत,
पैल तीर न्याहाळत.
येईल एक होडी अलगद 
माझ्या नावाचे शीड फडकावत 
नावाडी नसलेली. 
तोवर, असू दे, शब्दांचे हे तुकडे हाताशी,
जाईल वेळ बरा, 
कलिडिओस्कोप मध्ये टाकल्यावर ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा