शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

आधार


हे आकाशा,
तू अस्पर्श आहेस पण म्हणून अमान्य नाहीस मला,
तुझ्या अस्तित्वाच्या ठळक खुणा जाणवतात सतत मला!
हा सूर्य, काय आधार आहे त्याला तुझ्या शिवाय?
आणि कुठे वसला असता चंद्रही, नसतास तू जर?
चांदण्याचे मखर तरी सजले असते कां तुझ्याविना?

हे निलेशा,
तुझंच वेड भरते उमेद त्या पक्ष्यांच्या पंखांत
आणि मोजतात ते भरारी आपली तुझ्याच उंचीने
पहिली झेप आणि ओढ त्या पिलांना तुझीच असते
आणि हे वृक्ष, रसरसलेले आनंद फुलांनी,
आळवतात हिरव्या गीताचे सूर,
उंचावून सारे हात तुझ्याच दिशेला...

रे,
तू आहेस म्हणूनच नव्या कल्पनांना निवारा आहे,
धाडस होते, नव्या दिशा धुंडाळण्याचे ,
वाटा हुकल्या, दिशा चुकल्या तरी तुझी निळाई
पाझरतच असते तशीच, पूर्वीसारखी....

अरे,
तू निकेतन आहेस साऱ्या अनिकेतांचे!
आपले रौरव, आपली धग, आपला दाह हरवून
रक्तलांच्छित झालेला, थकला भागला, क्लांत सूर्य
तूच उचलतोस त्या क्षितिजापाशी आणि
नवी उमेद, नवा उत्साह भरून पुन्हा
उतरवतोस प्राची वरच्या रिंगणात...

रे,
आपल्या चांदणी स्वप्नांचे पूर्णत्व मिरवणाऱ्या
पौर्णिमेचे कौतुक तूच दाखवतोस साऱ्या जगाला
त्या चंद्राच्या गवाक्षातून......
आणि उध्वस्त स्वप्नांनी काळवंडलेल्या निशिकांतास
आपल्या कुशीत घेऊन समजूतही घालतोस तूच!

सर्वव्यापी,
तू मुक्तद्वार आहेस लडिवाळाचे ...
हे किरमिजी, काळे, सावळे अन पांढुरकेही ढग
घालत असतात मुक्त धिंगाणा तुझ्या अंगणात..
असे दालनच नाही तुझ्या मनाचे एकही जिथे
ते डोकावू शकत नाहीत; किंबहुना तुझ्या मनाचा कापूसवाळा
मऊशारपणा तू त्यांच्यासाठी उधळून लावतोस ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा