गुरुवार, १ डिसेंबर, २०११

निरुद्देश

निरुद्देश (१९७४ सालातल्या  'बेकारी'च्या काळातला  एक  दिवस )
*************************************************

भर दुपारी
खिडकीच्या चौकटीतून
बघतोय मी,
समोरच्या खांबावरचा
निरुद्देश कावळा!

तिरक्या नजरेतून त्याच्या
सजते आहे ऐट,
न शिवलेल्या पिंडाची,
डोळ्यात आत्मप्रौढ प्रतीक्षा
घरट्यात उबणाऱ्या अंड्याची..

असाच बसणार आहे वाट पहात
समोरच्या खांबावरचा निरुद्देश कावळा,
मागील दारातून येणाऱ्या खरकट्याची;
न कंटाळता, हाट हुडूतला न भीता,
येणाऱ्या अगांतुकाची सूचना देत!

काव काव चा अभंग घुमतो आहे........    

मी सकाळचा पेपर तिसऱ्यांदा चाळतो,
या वेळी .... मागून पुढे....
**** च्या साठी ***** यांनी *** येथे
मुद्रित व प्रकाशित केले;
wanted च्या unwanted जाहिराती;
बातम्या कालच्या सभेच्या, आजच्या मोर्च्याच्या,
उद्याच्या संपाच्या...त्याच त्या...
युवकांना तेच ते, बुरसटलेले, वास मारणारे
संबोधन, कुणा गलेलठ्ठ  खुर्ची मठ्ठ बगळे पंडिताचे,
"आजच्या कठीण परिस्थितीत देशाचे भविष्य,
भवितव्य, युवकांच्या हाती ...."

मी माझा तळवा प्रकाशात
धरून बघतो, आणि
भस्सकन सांडतो डोळ्यात, बोटांच्या फटीतून
अंधार माखला प्रकाश आणि त्यांत तळपणारा
समोरच्या खांबावरचा निरुद्देश कावळा!

मी वाचतो घरपोच वाचनालयातील
एक रुपया व हौसेसाठी
लिहिल्या जाणाऱ्या कथा किंवा कविता....
ब्याकग्राउंडला " पिनेवालोको पिनेका बहाना चाहिये..."

मन चाहे गीत, आपकी पसंद,
फरमाईशी गीतांच्या वेव्हज वरून
घरंगळतो मी २५" बाय १३" च्या
self - addressed तिकीट लावलेल्या
लिफाफ्यातून- व्हाया मुंबई, दिल्ली,
नागपूर, बंगलोर, हैद्राबाद-
चार वाजताच्या आयत्या चहाच्या कपांत .....

पण तो तिथेच असतो,
चोचीने खरकटे पुसत, आत्म-मग्न.
कुठलासा अन्न-प्रसन्न उकीरडा हुंगत,
समोरच्या खांबावरचा कावळा; पहात
कललेल्या संध्याकाळी,
खिडकीतल्या चौकटीतील
निरुद्देश मी!

- श्रीधर जहागीरदार


1 टिप्पणी: