रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

सल



सल  
***
तुला ठाऊक असेल का ?
उमलत्या वयात मी दाखवलेला 
समंजसपणा ... 

आणि त्यानंतर घडत गेलेल्या 
आपल्या तुरळक भेटीत 
तू दाखवलेला निर्विकारपणा ;

वाढतच गेलाय मनात कुठलासा सल  !!

अशातच आठवलं 
एकदा वहीत तू लिहिलेलं  
" तुला न प्राजक्त समजलाय, न बकुळी " 

हा सल .... प्राजक्ताचा की बकुळीचा?

- श्रीधर जहागिरदार
२५-०२-२०१८

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

सैरभैर

 
सैरभैर  
*******
पानगळीला  सुरुवात झाली 
कि मन सैरभैर व्हाव 
हे नेहमीचंच !
त्या काळात
दडपण असायचं, 
पायरी पायरीवर द्याव्या लागणाऱ्या.  
अवघ्या अस्तित्वाला भेदून जाणाऱ्या
एकेक प्रश्नाचं ... 
  
आयुष्यातली अवघड गणितं सोडवून घ्यायला 
येत असे मग तुझ्याकडे. 
नव्या पालवीने आलेला आत्मविश्वास
मग पुरायचा पुढील तीन ऋतू   …… 
.. 
अचानक वाटा बदलल्या
अंतर वाढलं 
गणित बदलल 
उदाहरणं बदलली,
आणि उत्तरंही .. 

मात्र  पानगळ सुरु झाली 
कि सैरभर होण तसच सुरु राहिलं ….
आता 
पानगळ सुरु झाली कि
तुझं मला सांगणं  :
"नेमकं गणित कुठे अडलं 
हे एकदा भेटून समजून घे 
म्हणजे मन शांत होईल 

पालवी भेटेलच
याची खात्री नाही आता !!"


- श्रीधर जहागिरदार 
१३ फेब्रु २०१४