गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

चाहूल

चाहूल कशाची आहे... ?
ही भूल ... तुझी तर नाही?
धूसरशी वाट अशी कां
मज ओढ लावुनी पाही ...

स्मरणातुन ओघळताना
ही बोच कशाला उरते
पानातुन सुकली बकुळी
वाऱ्यावर अलगद उडते ...

भवताल अशातच उधळे
धूपाचा दर्प कुठुनसा
कोलाहल झांज रवाचा
हो श्वास जरा कातरसा...

विस्तारत जाती अंतर
बीजातुन फुलता नाती
जे फूल उरावे तरूवर
ते गळते शोधत माती ...

- श्रीधर जहागिरदार
२९ आगस्ट २०१७

गुरुवार, १९ जुलै, २०१२

गीत - शोध माझ्या फुला तू


शोध माझ्या फुला तू, गंध प्रीतीतला ...
प्रीत फुलली मनी हे कां कळेना तुला.... 
लाजते  ... बोलते ... बोलता लाजते. ...
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना तुला.... 

तू मनी  कोंदणी, हरघडी हर क्षणी,
वाट पाही, शिणे, बघ  इथे  पापणी....
बावरे, सावरे,  भेटता तू मला.
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना  तुला....  

आज रे हासला बघ कसा मोगरा      
सांगतो गुज तुला, गंध त्याचा खुळा, 
माळ ना, साजणा, साद देतो तुला 
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना  तुला....

- श्रीधर जहागिरदार 


गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

वळणावरच्या गुलमोहरा


          वळणावरल्या  गुलमोहरा,
          तू  असा हुरहुरु नको,
ओसरले जरी गीत फुलांतील आज परंतु झुरू नको...

          नियमाने जे तुला भेटले,
          ते क्षितिज जरी आज पेटले,
आस तयाची धरू नको, तू असा हुरहुरु नको......

          आकाशाने जरी ताडले,
          पर्जन्याचे आसूड ओढले,
तुला सांगतो, डरु नको, तू असा हुरहुरु नको......

          सूर घेउनी पक्षी उडाले,
          दूर तमातच  शब्द बुडाले,
मौनात असा गुदमरू नको, तू असा हुरहुरु नको......

          संग सुटला जुना परिचीत,
          रंग उडाले सारे अवचित,
फिरून त्यांना वरु नको, तू असा हुरहुरु नको......

          गंध अगतिक करी याचना,
          शपथ प्रीतीची मागे दाना,
रिती ओंजळी भरू नको, तू असा हुरहुरु नको......






सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

गीत



विरल्या कुठे माझ्या फुला त्या गंध चमेली शपथा
त्या चन्द्र-खुणा, त्या भाव-खुणा, त्या दंवात भिजल्या कथा।


फुलपांखरी गीत प्रीतीचे अधरावर फुलले,
उडून अचानक तव ओठांवर अलगद जाउन झुलले,
त्या गीताचे सूर विसरली बहर वनातुन जाता ....
विरल्या कुठे माझ्या फुला त्या गंध चमेली शपथा।


चन्द्र मोकळा दिठीत आला, मिठीत कुंतल रात,
स्पर्शामधुनी वीज थरकता, झाली गंध-गहन बरसात,
त्या गंधाचे दंश अनोखे आठवतो मी आता ...
विरल्या कुठे माझ्या फुला त्या गंध चमेली शपथा।