बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

जाणीव

आपले चंद्र सूर्य वसवायला, तू माझे  आकाश नेलेस
मला राग नाही;
स्वप्न फुलांची आरास सजवायला, माझी रात्रही  नेलीस,
तरी मला जाग नाही.
कधी दंवात नहायला, पहाट देखील तू पळवलीस,
तरी कपाळी आठी नाही;
फुले आपली भारायला, गंध सारा शोषून नेलास,
तरी आडकाठी नाही.

कुणी कधी मागू नये असं जेव्हां मागू लागलीस,
तेव्हां नजर वर झाली,
हा तर माझा हक्क आहे, असं बजावून,
सारे काही लुटून गेलीस!

जाणीव जागी झाली जेव्हां,
डोळ्यात अर्थांचे कवडसे शोधले,
मग त्याच वेळी नेमके,तुझ्या
डोळ्यात अवसेचे आकाश कां दाटले?
  


गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

वळणावरच्या गुलमोहरा


          वळणावरल्या  गुलमोहरा,
          तू  असा हुरहुरु नको,
ओसरले जरी गीत फुलांतील आज परंतु झुरू नको...

          नियमाने जे तुला भेटले,
          ते क्षितिज जरी आज पेटले,
आस तयाची धरू नको, तू असा हुरहुरु नको......

          आकाशाने जरी ताडले,
          पर्जन्याचे आसूड ओढले,
तुला सांगतो, डरु नको, तू असा हुरहुरु नको......

          सूर घेउनी पक्षी उडाले,
          दूर तमातच  शब्द बुडाले,
मौनात असा गुदमरू नको, तू असा हुरहुरु नको......

          संग सुटला जुना परिचीत,
          रंग उडाले सारे अवचित,
फिरून त्यांना वरु नको, तू असा हुरहुरु नको......

          गंध अगतिक करी याचना,
          शपथ प्रीतीची मागे दाना,
रिती ओंजळी भरू नको, तू असा हुरहुरु नको......


मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

जखम


नेलीस फुले तू येथून सारी,
पण गंध राहिला माघारी;

ही गंधाची जखम गहीरी,
हवी हवीशी, नको नकोशी,

उत्कट दुखरी, उत्कट दुखरी.....शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

पुष्प ऋतू


येशील सखये माळून  गजरा,
होईल अपुला  ऋतू साजरा...

प्राजक्ताने  भरेल  ओंजळ,
देहावरती निर्मळ  दरवळ ...

कानावरती धम्म ग चाफा
कानशीलाशी फुटतील वाफा ...

शेवंतीचा डौल रांगडा
धमनी मधुनी घडा चौघडा...

बकुळीचा मोहातूर  गंध 
सैरभैर मन, नुरेल बंध....

असा जुईचा प्राण ग नाजूक
चिमटी मधुनी सुटेल अलगद ...

                                                                        उठेल पेटून मग ही शेज
                                                                        उदंड ज्वाला, केशर तेज ......

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

प्राक्तन

भिरकावून देण्यासाठीच असेल हे अस्तित्व वारंवार,
तर कशासाठी जपल्या श्वासांच्या खुणा,
मी एकटाच नव्हतो त्या वळणावर अनिवार
तू ही शामिल त्या जल्लोषात पुन्हा पुन्हा .....

बिन नाळेचाच  जन्मलोय मी, 
तुझ्यामागे नियमांचे  धागे अनंत,
उजाड माळावर आणखीनच उजाड  झालोय,
याची तुला कशाला मलाच खंत!

सावली सुद्धा निघून जाते संधी साधून
जेव्हा दाटून येते भयाण रात्र काळी,
भर दुपारी तापत्या उन्हात सावली हरवून 
भूताड व्हायचं तेवढ फक्त माझ्या भाळी! मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

चेहरा अनोळखी रे

माझा मलाच झाला चेहरा अनोळखी रे,
नांवे अनेक त्याला, मिळतात सारखी रे!

यात्रेत रंगलो मी, घेऊन टाळ हाती,
माझाच देव करती  काढून पालखी रे! 

ज्ञानी म्हणून फार ते नावाजती जगात, 
येता परि  घराला, कळतेच लायकी रे!  

"बोला सदा खरेच ", हे सांगतात संत, 
ऐकून सत्य येथे  फुटतात टाळकी रे! 

शब्दांस मोकळीक आहे इथे मिळाली,    
अर्थावरी परंतु त्यांचीच मालकी रे!

विश्वास ठेवण्याला तत्पर सदाच सर्व,
प्रेमास मात्र नाही उरलाच पारखी रे!    

जत्रेत नाचला  'श्री'  फासून रंग तोंडी,
आहे कसा कळावा, भलताच बेरकी रे!