गुरुवार, १२ जून, २०१४

प्रेषित
त्याचं  'नुसत' असण
सहन होत नाही त्यांना
कारण त्यांना घेता येत नाही
निर्णय …त्याच्या  स्थानापन्नतेचा (म्हणे !)
खर तर अंदाज  त्याच्या विपन्नतेचा …
प्रथम दर्शनी न्याहाळतात
त्याच्या "नुसते" पणा भोवतीचे
पोषाखी आवरण:
निमुळत्या लेंग्याचे आखूडपण /
धोतराच्या सोग्याची लांबी /
सदऱ्याच्या  कापडाचा पोत,
कपाळावरील टिक्याचा रंग, आकार, ठिकाण
आणि मांडतात आडाखे
त्याच्या सभ्यता-संस्कृती चे
आणि परस्पर ठरवतात कळप त्याचा !
कळपाविना 'नुसतं' असण
मान्य कां नसाव यांना ?
कळप- निरपेक्ष स्वागताचे वाण
बसत नाही त्यांच्या स्वागत यंत्रणेत ….
 ३
हळूच विचारतात नांव,
आडा सकट !
नुसत्या पोहरयावरून
समजत नाही त्याचं नेमकं पाणी….
आणि मग ते निश्चित करतात
मनातल्या मनात त्याच्या विचारांचा घाट,
तो  काही बोलण्याआधीच !
खड्ग परजायचं कि फूल सजवायचं
हे ठरवायचं असत त्यांना,
काही ऐकण्या आधीच !!
आणि
शोधत रहातात काही भौगोलिक संदर्भ
त्याच्या घामाच्या दर्पातून, वस्त्र मालिन्यातून
दगडा काट्यांनी सोलपटलेल्या
अनवाणी पायातून ठिबकणाऱ्या रक्त थेंबातून,
'नुसत्या' जखमांनी मन द्रवत नाही त्यांच, 
जिवंत ठेवलेले असतात त्यांनी मनांत
बरबटलेले शिलालेख संस्कृतीच्या नांवाखाली,
उपचारासाठी संदर्भ वापरतात त्यांचे … 
आणि चिरंजीव होते
शतकांच्या विषाणूंनी ग्रस्त
त्याची  जखम  !!
काहीही मान्य करण्याआधी
तो  असावाच लागतो त्यांच्या सारखा
त्यांच्या तोलाचा , त्यांच्या मोलाचा
म्हणून त्यांच्या घराच्या ओसरीवर
निवांत टेकलेला तो विपन्न फकीर
हाकलून लावतात ते …
आणि तो दिसेनासा झाला
कि करतात स्थानापन्न
आलिशान महालात सिंहासनावर
स्वर्णाभूषणांनी मढवून  त्याची प्रतिमा
आरती ओवाळायला !!!


- श्रीधर जहागिरदार
१२-०६-२०१४