सोमवार, ४ जुलै, २०११

वय वाढते तसे



वय वाढते, तसे लहान होत रहावे
समजून उमजून.
निखळ आनंद मग लुटता येतो
संकोच सारा विसरून।

पावसात भिजत कागदी नाव
सोडता येते अलगद,
फुलपाखरा मागे धावता येते
काट्या कुट्यात धड पडत!

गवतात मनसोक्त लोळत
न्याहाळता येते आकाश,
स्वप्नाशी खेळता येते,
तरंगत सावकाश!



वय तर वाढणारच,
थोपवण नाही आपल्या हाती,
फुलपण जपू या त्याचे नको होऊ दे माती.

३० जून

तीनशे पासष्ट दिवसताला
हा खास दिवस.
जगच अस्तित्वात आले ह्या दिवशी.
आणि आपसूक जुळलेली नाती-
काका, आत्या, मामा, मावशी..
 पुढे जाणीवपूर्वक जोडली माणसे,
अस्तित्वाला अर्थ देणारी
गहिरा रंग भरणारी,
प्रेमाची, मैत्रीची, आपुलकीची..
 आता ह्या दिवशी दिशादिशातुन
गंध भरुन आणतो वारा
शुभेच्छांचा!

तीनशे
पासष्ट दिवसातला
हा खास दिवस..