सोमवार, २६ डिसेंबर, २०११

वर्ष एक पार झाले

वर्ष  एक पार झाले, काय रे साकार झाले?
मोडले की जोडले? प्रश्न अपरंपार झाले!   

रचनेचा देत भास, हर क्षणी होत ऱ्हास,
झोळीत झाकले दिलासे, कां  असे लाचार झाले?

असणार उद्या वेगळी, आशा  चिरंतन ठेवली,
होते म्हणून साहिले, रोज जे चित्कार झाले!

आले ऋतू, गेले ऋतू, राहिला रे एक किन्तू, 
ही कुणाची योजना, कंटकाचे सत्कार झाले!

साधलेसे वाटले, कसे अचानक बाटले,  
कोणी तरी  फितूरले, दुष्मनांचे यार झाले! 

मैफिलीत सामीलसा, तो उभा कसनुसा, 
ना कुणी आमन्त्रिले, जा घरी, आभार झाले!

बदलली रोज वाट, धुंडाळले  नवीन घाट,
नीरसाचा त्याग हा, जीवनाचे सार झाले!

बस्स  पुरे एक थेंब, आकाश-वेधी हरित कोंब,
तृण  फुलाचे गीत 'श्री', वंचीता आधार झाले!   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा