बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

फूल, पक्षी, आणि जखम

आत आत ...कुठे  मनात ....
एक फूल गंधाळते,  
दरवळ त्याचा उधळायला 
वारा चौफेर धुंडाळते...
(...इथला गंध दुसऱ्या मनात
त्याला असतो रुजवायचा,
देव्हारा नदीकाठचा 
त्याला असतो सजवायचा..)


आत आत ... खोल मनात ...
एक पक्षी फडफडतो
बाहेर निसटून उडण्यासाठी 
किती बरे  धडपडतो...
(..कधी त्याला गायचं असतं, 
कधी  झोकात झुलायच  असतं,
कधी निवांत फांदीवर 
नुसतच  बसून रहायचं असतं...) 

आत आत ...खोल खोल...
एक जखम भळभळते, 
जन्माचा घेत शोध
मरणा कवटाळते....
( .. तिला काहीच स्मरायच नसत... 
तिला कधीच भरायचं नसत ..
'आयुष्य' हे नाव मिरवत
तिला फक्त जगायचं असत,,,,
)

- श्रीधर जहागिरदार
२८-११-२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा