बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

पराभव

माझ्या पराभवाचा सत्कार आज आहे,
येणार वेदनेला आकार आज आहे...

आकाश जिंकल्याचा केला किती बहाणा,
कळले परि मनाला तो व्यर्थ माज आहे...

मृगजळात जल्लोषाच्या वाहून दूर गेलो,
पण मोल आसवांचे कळणार आज आहे...

किती वाजल्या दुन्दुभी, किती गाजले नगारे,
आता वेदनेतून सजणार साज आहे....

त्यांना हवे म्हणुनी फाटून ओठ हासे,
ह्या बेगडी जिण्याचा फुटणार ताज आहे...

मी जाहलो जगाचा, न राहिलो स्वता:चा, 
माझा फिरून मजला कळणार बाज आहे ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा