मंगळवार, ८ मे, २०१२

जिंकण्याची जिद्द आहे...



"जिंकण्याची जिद्द आहे! जिंकण्याची जिद्द आहे!
दाखवा कोठे रिपू, ते मारण्या मी सिद्ध आहे,"
जिंकण्याची जिद्द आहे?

गाठण्याला लक्ष्य त्याचे, धावला.. ठेचाळला, 
अडथळ्यांची रांग बघता जाहला तो क्रुद्ध आहे...    
जिंकण्याची जिद्द आहे?
सोडतो स्पर्धेत मागे, तोच  वाटे  शत्रू खरा,
आग आग काळजांत, तळमळे, मन विद्ध आहे...
जिंकण्याची जिद्द आहे?

क्लांत देह, जीव दमला, रिचवितो पेले किती 
'एक घेई होण्यास मार्गी', हरपली ती शुद्ध आहे...
जिंकण्याची जिद्द आहे?

जिंकण्या छोट्या लढाया, शील डावास लावीतो,   
संपते का मग कधी,  जे  चिरंतन युद्ध आहे ....  
जिंकण्याची जिद्द आहे?

झिंग चढता ती यशाची, कामिनी घे कवटाळूनी  
लिप्त तो कामात झाला, सोडीली ती हद्द आहे....   
जिंकण्याची जिद्द आहे?

षड रिपुंचे आव्हान जो, सहज परतुनी लावतो,
तोच रे रिपू दमन,  जाण तो तू खुद्द आहे.... 
जिंकण्याची जिद्द आहे!!

जिंकण्या आधी जगाला, जिंकले आहे स्वत:ला,
तोच केवळ बुद्ध आहे, जिंकण्याची जिद्द आहे! 
जिंकण्याची जिद्द आहे!! 

- श्रीधर जहागिरदार 
२ मे २०१२ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा