रविवार, ४ डिसेंबर, २०११

आरशात बघणे अता टाळतो मी

आरशात बघणे, अता टाळतो मी,
असते तसे स्वीकारा, नियम पाळतो मी.

अभ्यास केला गहन, तरी नापास मी,
गाईडे  आता ही म्हणून चाळतो मी.

अंतरंग? नाही, बेगडी विकते इथे,
रंगलेला चेहरा बघून भाळतो मी.

माजले बडवे, देव झाला परागंदा,
आड येता मला सद्विवेक जाळतो मी.

मावळले यौवन, प्रेम ना कळले परि,
फुले कागदी केसांत तुझ्या माळतो मी.

वाचले धर्मग्रंथ  'श्री' जरी  येथून तिथे,
चामडी जळते तसे संदर्भ गाळतो मी.


गुरुवार, १ डिसेंबर, २०११

निरुद्देश

निरुद्देश (१९७४ सालातल्या  'बेकारी'च्या काळातला  एक  दिवस )
*************************************************

भर दुपारी
खिडकीच्या चौकटीतून
बघतोय मी,
समोरच्या खांबावरचा
निरुद्देश कावळा!

तिरक्या नजरेतून त्याच्या
सजते आहे ऐट,
न शिवलेल्या पिंडाची,
डोळ्यात आत्मप्रौढ प्रतीक्षा
घरट्यात उबणाऱ्या अंड्याची..

असाच बसणार आहे वाट पहात
समोरच्या खांबावरचा निरुद्देश कावळा,
मागील दारातून येणाऱ्या खरकट्याची;
न कंटाळता, हाट हुडूतला न भीता,
येणाऱ्या अगांतुकाची सूचना देत!

काव काव चा अभंग घुमतो आहे........    

मी सकाळचा पेपर तिसऱ्यांदा चाळतो,
या वेळी .... मागून पुढे....
**** च्या साठी ***** यांनी *** येथे
मुद्रित व प्रकाशित केले;
wanted च्या unwanted जाहिराती;
बातम्या कालच्या सभेच्या, आजच्या मोर्च्याच्या,
उद्याच्या संपाच्या...त्याच त्या...
युवकांना तेच ते, बुरसटलेले, वास मारणारे
संबोधन, कुणा गलेलठ्ठ  खुर्ची मठ्ठ बगळे पंडिताचे,
"आजच्या कठीण परिस्थितीत देशाचे भविष्य,
भवितव्य, युवकांच्या हाती ...."

मी माझा तळवा प्रकाशात
धरून बघतो, आणि
भस्सकन सांडतो डोळ्यात, बोटांच्या फटीतून
अंधार माखला प्रकाश आणि त्यांत तळपणारा
समोरच्या खांबावरचा निरुद्देश कावळा!

मी वाचतो घरपोच वाचनालयातील
एक रुपया व हौसेसाठी
लिहिल्या जाणाऱ्या कथा किंवा कविता....
ब्याकग्राउंडला " पिनेवालोको पिनेका बहाना चाहिये..."

मन चाहे गीत, आपकी पसंद,
फरमाईशी गीतांच्या वेव्हज वरून
घरंगळतो मी २५" बाय १३" च्या
self - addressed तिकीट लावलेल्या
लिफाफ्यातून- व्हाया मुंबई, दिल्ली,
नागपूर, बंगलोर, हैद्राबाद-
चार वाजताच्या आयत्या चहाच्या कपांत .....

पण तो तिथेच असतो,
चोचीने खरकटे पुसत, आत्म-मग्न.
कुठलासा अन्न-प्रसन्न उकीरडा हुंगत,
समोरच्या खांबावरचा कावळा; पहात
कललेल्या संध्याकाळी,
खिडकीतल्या चौकटीतील
निरुद्देश मी!

- श्रीधर जहागीरदार


बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

जाणीव

आपले चंद्र सूर्य वसवायला, तू माझे  आकाश नेलेस
मला राग नाही;
स्वप्न फुलांची आरास सजवायला, माझी रात्रही  नेलीस,
तरी मला जाग नाही.
कधी दंवात नहायला, पहाट देखील तू पळवलीस,
तरी कपाळी आठी नाही;
फुले आपली भारायला, गंध सारा शोषून नेलास,
तरी आडकाठी नाही.

कुणी कधी मागू नये असं जेव्हां मागू लागलीस,
तेव्हां नजर वर झाली,
हा तर माझा हक्क आहे, असं बजावून,
सारे काही लुटून गेलीस!

जाणीव जागी झाली जेव्हां,
डोळ्यात अर्थांचे कवडसे शोधले,
मग त्याच वेळी नेमके,तुझ्या
डोळ्यात अवसेचे आकाश कां दाटले?
  


गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

वळणावरच्या गुलमोहरा


          वळणावरल्या  गुलमोहरा,
          तू  असा हुरहुरु नको,
ओसरले जरी गीत फुलांतील आज परंतु झुरू नको...

          नियमाने जे तुला भेटले,
          ते क्षितिज जरी आज पेटले,
आस तयाची धरू नको, तू असा हुरहुरु नको......

          आकाशाने जरी ताडले,
          पर्जन्याचे आसूड ओढले,
तुला सांगतो, डरु नको, तू असा हुरहुरु नको......

          सूर घेउनी पक्षी उडाले,
          दूर तमातच  शब्द बुडाले,
मौनात असा गुदमरू नको, तू असा हुरहुरु नको......

          संग सुटला जुना परिचीत,
          रंग उडाले सारे अवचित,
फिरून त्यांना वरु नको, तू असा हुरहुरु नको......

          गंध अगतिक करी याचना,
          शपथ प्रीतीची मागे दाना,
रिती ओंजळी भरू नको, तू असा हुरहुरु नको......






मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

जखम


नेलीस फुले तू येथून सारी,
पण गंध राहिला माघारी;

ही गंधाची जखम गहीरी,
हवी हवीशी, नको नकोशी,

उत्कट दुखरी, उत्कट दुखरी.....















































































शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

पुष्प ऋतू


येशील सखये माळून  गजरा,
होईल अपुला  ऋतू साजरा...

प्राजक्ताने  भरेल  ओंजळ,
देहावरती निर्मळ  दरवळ ...

कानावरती धम्म ग चाफा
कानशीलाशी फुटतील वाफा ...

शेवंतीचा डौल रांगडा
धमनी मधुनी घडा चौघडा...

बकुळीचा मोहातूर  गंध 
सैरभैर मन, नुरेल बंध....

असा जुईचा प्राण ग नाजूक
चिमटी मधुनी सुटेल अलगद ...

                                                                        उठेल पेटून मग ही शेज
                                                                        उदंड ज्वाला, केशर तेज ......

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

प्राक्तन

भिरकावून देण्यासाठीच असेल हे अस्तित्व वारंवार,
तर कशासाठी जपल्या श्वासांच्या खुणा,
मी एकटाच नव्हतो त्या वळणावर अनिवार
तू ही शामिल त्या जल्लोषात पुन्हा पुन्हा .....

बिन नाळेचाच  जन्मलोय मी, 
तुझ्यामागे नियमांचे  धागे अनंत,
उजाड माळावर आणखीनच उजाड  झालोय,
याची तुला कशाला मलाच खंत!

सावली सुद्धा निघून जाते संधी साधून
जेव्हा दाटून येते भयाण रात्र काळी,
भर दुपारी तापत्या उन्हात सावली हरवून 
भूताड व्हायचं तेवढ फक्त माझ्या भाळी!