शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

पुतळे




बक्कळ आहेत
गावागावात, चौकाचौकात,
पुतळे उभारलेले,
चौथऱ्यावर त्यांचा इतिहास
खरडलेले,
काहींच्या नांवाची आहे अजून चलती ,
म्हणून मिळते त्यांना स्नान
दोनेकदा वर्षाकाठी,
हार पडतो गळ्यात, टाळ्यांच्या गजरात
ऐकतात पुतळे मख्खपणे त्याचे महान कार्य
गुगललेले कुणी तरी नेटाने …
एखादा चलनातला पुतळा बघतो
त्याचीच शिकवण पायदळी तुडवत,
पुतळा बाटला असा ओरडा करत
गावाला आग लावत
फिरणाऱ्या त्याच्याच औलादी;
कारण एक कुणी अगतिक
पुतळ्याच्या आसऱ्याला आलेला निराश्रीत
दंडुका पडताच कुल्ल्यावर मध्यरात्री,
आकांताने पळालेला असतो
आपली फाटकी वहाण तिथेच सोडून ….
- श्रीधर जहागिरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा