बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

खिशात समुद्र भरता येत असेल तरच


खिशात समुद्र भरता येत असेल
तरच ती काडी काडेपेटीवर घासा रे …
उगाच आपले आग लावत फिरायचे उद्योग करू नका
बागेत पाखरेहि असतात, होरपळतात ती
आणि कोमेजतात फुले पहाटेच फुलण्याच्या वेळी !
पाखरे होरपळली कि पडतात भक्ष्य
व्यवस्थेच्या खातीरदारीत, तर
निसटलेल्या काहींची, होतात गिधाडे,
कोमेजलेल्या फुलांना पारजणारी   ….
येउन बसतात ती, बागेतल्या अतिप्राचीन
विस्तीर्ण, महाकाय वृक्षाच्या गार ढोलीत
छातीतला विखार जपत ….
बघतात,
भिडताना माळ्यांच्या टोळ्या
निसर्गदत्त इंद्रधनुष्याच्या रंगातला
फक्त एकेक रंग ओरबाडून,
बागेतील समस्त वृक्षवल्ली, फुले कळ्या
आपल्याच एका रंगात पेटवून काढण्याच्या मिषाने… 

चढवतात हल्ला मग, ढोलीतली गिधाडे टोळ्यांवर,
फुला - पाखरांना वाचवायला
उसळलेल्या आग डोंबात गिधाडे होतात धाराशायी,
होरपळतात पाखरे, कोमेजतात फुले,
होरपळलेली पाखरे, पाहिली आहेत मी
गिधाडे होताना, कोमेजलेल्या फुलांना पारजताना ….
म्हणून
खिशात समुद्र भरता येत असेल
तरच ती काडी काडेपेटीवर घासा रे …
- श्रीधर जहागिरदार

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

पुरावा


दरवेळी असेच होत आले  !

त्याने तिला। एकदाच । एका कोपऱ्यात । तिच्या मनाविरुद्ध । कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना । वासनेच्या अंधार क्षणी वगैरे … मारून टाकले मनानिशी  !

पुरवता आले नाहीत तिला समाधानी पुरावे,
न्याय मिळवण्यासाठी  ह्या हत्येचे, त्यांना हवे तसे ... 
त्या पुराव्यांचा पाठपुरावा करताना
सारे संभावित तिच्या अंगांगावर
प्रश्नांची नखे रुतवत, मनातल्या मनात
उपभोगत राहिले तिला
आणि  
जगावी लागली तिला ओंगळ सात मिनिटे
मनाविरुद्ध । पुन्हा पुन्हा …। कायदेशीर ठिकाणी . …. । कायदेतज्ञांच्या अखात्यारात। न्याय मिळेल ह्या आशेच्या अंधुक क्षणी ….
तिची बातमी करताना
ते ही  तेच घडवत राहिले, अहोरात्र
घराघरातल्या दिवाणखान्यातून
प्रकाश करून टीवीच्या पडद्यावर
कायद्याचे राज्य पुनर्स्थापित व्हावे ह्यासाठी …

पेटत्या मेणबत्त्या सांगू लागल्या तिला
सोड बाहूलीपण, हो ज्वाला
सबल हो सबल हो स्वबलाने लढ लढा


अखेर
पुढच्या वेळी ते घडताना
तिने एकवटले धाडस
ओरबाडून छाटले त्याचे ताठर शस्त्र
पुन्हा पुन्हा अस्तित्वावरच आघात  करणारे
आणि सरळ ठेवले नेऊन हातात
पुरावे मागणाऱ्यांच्या…

कायद्याच्या हतप्रभ सेवकांनी
तडकाफडकी केला गुन्हा दाखल
हत्येच्या प्रयत्नाचा 
आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा
तिच्या धाडसाविरोधात !!
*
(नर मादी संघर्षात
पौरुष गमावलेल्या नराने
हिरव्याकंच झाडाला लटकून
आत्महत्या केल्याची बातमी
जाहिरातींच्या चार पानानंतर
तिसऱ्या पानावरच्या तिसऱ्या रकान्यातली
वाचलीत का तुम्ही?)

- श्रीधर जहागिरदार

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

डायपर


एक हिंस्त्र वावटळ
उध्वस्त करून जाते
घर आणि त्या सोबत
आपुलकी, आशा, आधार,  ….निर्भयता …असे बरेच काही


मदतीच्या ओघांच्या उत्साही वर्दळीत
उभारले जात असेलही
घर, त्यावरचे छप्पर,
मेणबत्त्यांच्या प्रकाशात;
कधी त्याच ठिकाणी,
तर कधी निर्वासित छावणीत ……

मदतीची ठळक बातमी होते,  
मंदावतात क्लिक क्लिक फ्ल्याश,
आणि निवळते वर्दळ,
उभारलेल्या घरावर आपापले
शिक्के कोरून  …

बाळाला डायपर बांधून
निर्धास्त व्हावी आई
तसे होतात निर्धास्त
निर्वासिताला भयमुक्त केल्यासारखे

मात्र
गळत
राहतेच
उध्वस्त
मनातून
भीती ….
अविरत…. 
वावटळीच्या भासाने …. !

- श्रीधर जहागिरदार
१०-११-२०१५

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

हाशिया

हाशिया है
एक सच्चाई
मानो या ना मानो।

आश्स्वस्त है वो
जो बसता है हाशिये से दूर , 
गर्भस्तर पर
सुरक्षित घेरे में ...

और बनाता है हाशिया
असुरक्षित, उसे
जो रह जाता है किनारे पर
बचता हुआ भीड के रेले से …

हाशिया बसता है
हर मन में, किसी रूप में
छूआ नहीं जा सकता
महसूस होते रहता है .…


हाशिया है
एक सच्चाई
मानो या ना मानो।
- श्रीधर जहागिरदार

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

नारकासीस



आज राजीनामा मिळाला …
बरच काही लिहिले आहे
माझ्या मनाबद्दल ,
तिथे मिळणाऱ्या वागणुकीबद्दल,
होणऱ्या दुर्लक्षाबद्दल …  म्हणून म्हणे
मनातून निघून जायचा निर्णय घेतलाय !
लिहिलंय, " रुजू होताना
बरीच स्वप्ने दाखवली होती,
अख्खा करिअर ग्राफ मांडला होता
यमकापासून गमकापर्यंत …
म्हणाला होतात ' स्पार्क आहे,
शब्द लालित्य आहे,
सहज पोहोचेन गझलेपर्यन्त
मुशायऱ्यात प्रेझेन्टेशनची संधी
मिळेल वर्षभरात. " 
अस माझ पोटेन्शियल जोखल होत …
पण मुक्त च सोडलत मला, कारण
माझ एटीट्युड, इनिशियेटीव, सेल्फ मोटिवेशन...  
आणि टार्गेट अचीव होतच होते - दर रोज चारचे -
चार समूहांवर भेटी देत … वर मालकी हक्काची भिंत !!
नारकासीस झाला तुमचा
लाईकी आणि कमेंट बघून,
आत्मशोधाचा प्रवास खुंटला तुमचा तिथेच
आणि म्हणून माझाही ….

माझ्या डेवलपमेंटचा विचार केला नाहीत
कधी ट्रेनिंगला धाडले नाहीत,
छंद, वृत्त, बहर ह्याचे स्किल
माझ्यात जिरवले नाहीत,
मीटर मध्ये मला रचले नाहीत …

वेळ आली तसे अप्रेज केलेत एकदा
बोर्डरूम मध्ये, आणि ठरवलेत मला
"स्ट्यागनेटेड"  !!

सो बी ईट … "

राजीनामा तिचा आलाय
आणि मलाच झालय
अस्वस्थ बेरोजगारासारख,
माझ्याच मनात … 

- श्रीधर जहागिरदार

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

भीड़

 
आदमी का चेहरा
घुलता जा रहा है
एक भीड़ में ...
आदमखोर भीड़ में …
.
.
.
कुछ दोस्तों को खो चुका  हूँ
.
.
.
डरता हूँ
कहीं मैं भी .... 

.
.
बस अपने
नाखून काट लेता हूँ,
सुबह शाम ... 


नहीं बनना चाहता 
मैं किसी तरह 
किसी ख़बर का हिस्सा !!

- श्रीधर जहागिरदार 

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५


सालाबादाप्रमाणे येणारच पाऊस,
कधी धुमसत, कधी भिरभिरत, कधी कोसळत...

त्याला आता माझ्या कौतुक शब्दांनी 
बांधत नाही मी.
तू असा, तू तसा, हे सांगायला
मनात एक ढग उमलावा लागतो,
मी तर सारे सूर्यच  नाकारून बसलोय 
आणि साऱ्या बाष्पाचे झालेत कधीच हिमकण!

मात्र  तू बरसलास की चिंब भिजायला 
अजून आवडत मला, स्पष्टच सांगतो
'लाईक' च  करतो मी, तुझी एकच  सर आली तरी,
माझ्या कौतुक शब्दांना तुझ्या सरीची सर नाही रे..
तेव्हा रसप तू बरसत रहा , पसरत  रहा 
थेंब न थेंब असाच ह्या हिमनगावर!!!
- श्रीधर