गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

ऋतूमग्न मन

फुले नसता झाडावर, 
झाड आसावते.
फुले, फुलता झाडावर,
झाड सुंदरते.
फुले, सुकता झाडावर,
झाड हिरमुसते.

 
झाडाची ही स्पंदने.
समोरच्या बाकावर बसून
ऋतूमग्न  मन 
अनुभवते.   

श्रीधर जहागिरदार 
२६-१२-२०२५

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

कैदी

तुरुंगातला कैदी 
फक्त संधी शोधतो
फरार होण्यासाठी.
मुहूर्त नाही..

आत्मा कैदीच!

इन्व्हेस्टिगेशन 
टाईमपास 
राजकारणी नातलगांचा!!

मतांची पंगत. 
या न त्या कारणाने.

- श्रीधर जहागिरदार
८ सप्टेंबर २०२४

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

रिअर मिरर

मागे वळून बघताना... पण कशाला बघायचं मागे वळून? अनुभवातून गाळून आलेला अर्क भिनलेला असतो मेंदूत. नव्या वाटा तुडवायला तयार झालेलं असतं मन. नवी नजर दाखवून देते एक वेगळी संधी. हातात आलेली असते अनोखी ताकद, पाय वळू पहातात नव्या दिशेला. यशापयशाची चिंता नुरलेली असते.

ब्रदरचा फोन येतो, "सर, एक पेशंट आहे. जरा बोला त्याच्याशी. भयाक्रांत आहे. उपचार नुकतेच सुरू झालेत."  मी बोलतो. रिअर मिरर मधे बघून माझ्या सत्य नारायणाची कथा सांगतो. वादळाचे वर्णन करतो, जोरात हेलकावे खाणाऱ्या नौकेवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल प्रामाणिकपणे सांगतो, मजबूत सुकाणूवर असलेल्या श्रद्धेबाबत बोलतो.
दूरवर अंधुक दिसणाऱ्या दीपस्तंभामुळे पाय ठामपणे ठेवायला जमीन मिळणारच ही प्रचंड आशा... तिच्यावर भरभरून बोलतो. पेशंट थम्सअप करतो... मी भरून पावतो.

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

बुजगावणे

त्याने रिवाजाप्रमाणे 
उंच उभारले .... बुजगावणे.
आणि केले भरात आलेले
आपले शेत त्याच्या हवाली.

निर्धास्त झाला तो!

आताशा बकाल झालंय आकाश 
भिरभिरणारी पाखरं हरवून 
गिधाडं सांभाळतय ते. 

हे त्याच्या कधी लक्षात येणार?

- श्रीधर जहागिरदार
२०.८.२०२४

मंगळवार, १६ जुलै, २०२४

संग्रह 

तू लिहितो आहेस इतकी वर्ष 
पण संग्रह काढला नाहीस.
तुला चांगल्या वाटणाऱ्या 
पाच पन्नास कविता धाड मला.
काढू आपण संग्रह. 

मी तीन महिन्यांनी त्याला
दिले धाडून. 

त्याचा फोन आला.
अरे तू एकच पान धाडलेस;
तेही कोरे.

साऱ्या कवितांचा मिळून
मला आता उमगलेला 
अर्थ पाठवलाय तुला 
संग्रहीत करून. 

- श्रीधर जहागिरदार
आगस्ट २०२३

रविवार, ३१ मार्च, २०२४

मी

तुला समजून घेताना
जरा बाजूस होतो... 'मी'.

सुखाचे चोचले पुरवत
क्लेश जिरवून घेतो मी.

कुणाशी वैर नव्हते पण
स्वतःचा मित्र नव्हतो मी.

विनासायास मिळते जे
फुका मिरवून घेतो मी.

तमाची कां करू चिंता?
दिवा होऊन जळतो मी.

भरारी उंच घेताना 
धरेचा दूत असतो मी. 

- श्रीधर जहागिरदार

गुरुवार, २१ मार्च, २०२४

जळ थरथरले

कसे तू म्हणशी  हातून कधी ना घडले भलते
जे घडले, अनवधनाने, ते अजून आहे सलते,

त्या वाटेवरुनी जाता का उगाच जळ थरथरते ?

श्रीधर जहागिरदार 
१५.३.२०१३

तुम खुदकुशी नही कर सकती

तुम बेचैन हो सकती हो 
बौख़ला नहीं सकती 
तुम लड़खड़ा सकती हो 
स्वयं गिर नहीं सकती। .. 

तुम नाराज़ हो सकती हो 
गुस्सा कर नहीं सकती 
किसी कोने में दुबक सकती हो 
दहलीज़ लाँघ नहीं सकती 

रहस्यों की गुत्थी सहेज सकती हो 
सहज उजागर कर नहीं सकती 
हाँ, तुम कविता हो सकती हो 
नही, कहानी हो नहीं सकती 

हत्या हो सकती है तुम्हारी 
तुम ख़ुदकुशी कर नहीं सकती

- श्रीधर जहागिरदार

अंतर्नाद


एक विदुषक माझ्या आतील 
सोडत नाही पाठ
असह्य होता उरी वेदना
कणा ठेवतो ताठ.

सुश्रृताच्या हाती देता
देहाची सारंगी 
विदुषकाच्या गळ्यात घुमते
धून नवी श्रीरंगी

ग्लानी मध्ये ऐकत असता 
मी धीराची वाणी
खुशाल बसतो आत विदुषक 
गात पोपटी गाणी.

अविरत चाले वटवट याची
आत कसा हा आला
ओळख पटली विदुषकाची 
अंतर्नाद गवसला.

- श्रीधर जहागिरदार

खिडकी

एक खिडकी असते कविता 
आत काय असेल याची उत्सुकता 
चाळवणारी, 
असलाच पडदा तिच्यावर 
तरी अदमास करायला लावणारी.

कविता असते एक खिडकी 
आश्वासक गज लावून 
अंतरंग सुरक्षित ठेवत 
संवाद साधणारी.

कविता एक खिडकी असते 
किलकिली, 
संदर्भ न देता, भिंतीवर टांगलेल्या
तसबीरी दृष्य-अदृष्य करणारी. 

कविता खिडकीत वसते.
खिडकी कवितेत असते.

- श्रीधर जहागिरदार 
२१ मार्च २०२४

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

बाळकृष्ण

त्याने उघडले फ्रिजचे दार सताड फिरवली नजर आतल्या ब्रम्हांडावर उचलला नेमका एक डबा लावले दार अलगद, आवाज होणार नाही याची दक्षता पाळत ! वळला आणि सुसाट पळाला डायनिंग टेबलाच्या खाली बसला डबा उघडून, डोळे बंद करुन समाधी लावून ... काय चाललंय? नानूने विचारले मी बेरी खातोय , सांगू नको ममाला डोळे न उघडता तो म्हणाला रोज संध्याकाळी नानीच्या मांडीत "हा बालकुष्ण आहे ना" विचारून निमुटपणे बसतो, हात जोडून, शिकवणीला बसल्या सारखा..

रविवार, ३० जुलै, २०२३

भिंग

मान्य! तुम्ही माझे सुहृद आहात , हितचिंतक आहात, मनापासून कळवळा आहे माझ्या बद्दल तुमच्या मनात… नक्कीच तुमचा शब्द माझ्या भल्यासाठी योजता तुम्ही. पण तरी, हे सारं होत असताना एकांत हवाच असतो मला माझा स्वत:च स्वत:ला तपासायला, तुमची तपासणी तुमच्या भिंगातून कधी मलाही सवड द्या माझे भिंग तपासायला !! - श्रीधर जहागिरदार

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

मैं बंँटा हूँ

मैं बँटा हूँ 

अंदर ही अंदर, टुकड़ो में ... 
नाम, जाती, पंथ, भाषा, विचार 
रोजगार, व्यवसाय, खान-पान

कुछ टुकड़े सहमे सहमेसे 
बसते है भीड़ से दूर , 
अपने स्वतंत्र अस्तित्व के प्रति
असमंजस में... 
सिकुड़े हुए हाशिये में !

मन को हवाएं छूती है 
न जाने किस किस दिशा से आती है 
कुछ सहलाती है किसी टुकड़े को 
हाशिये के पास से गुजरते हुए 
अच्छा लगता है, 
पर तभी कुछ डराती है 
लाल धूल सना बवंडर बन .....

"क्यूँ डरते हो ?" 
पूछता है भीड़ से सना 
गर्म हवा का झोंका

नहीं बता पाता 
हाशिये में डर ही तो बसता है !!
काश ! समझ सकती ये भीड़ 
सदियोंसे हाशिया छोड़, 
व्यवस्था की व्याख्या लिखनेवाली !!

- श्रीधर जहगिरदार

शुक्रवार, २२ मे, २०२०

उंदीर



आज जुने पेपर विकले ... 

तशी चणचण नव्हती 
पण छोट्या नोटेची किंमत 
चांगलीच कळली होती  

गोळा केले, 
इकडे तिकडे विखुरलेले 
कपटे चिपटे खंगलेल्या शब्दांचे,
पिवळे पडलेले लिफाफे 
साभार परतलेल्या कवितांचे, 
 
भर पाडली त्यात 
काढलेल्या नोंदींची, 
उरकलेल्या कार्यशाळांसाठी;
हिने सुद्धा आणून दिली 
शंभर रेसिपींची शिजत पडलेली वही 
वाटलं आता तरी येईल वजन सही 
पण कमीच पडले ते ३५० ग्राम ने ... 

अचानक आठवली  
दोन पुस्तके :अर्थशास्त्र आणि वित्तीय प्रबंधनाची 
उंदीर शिरला होता एकदा घरात 
त्याने कुर्तडलेली 
दडवून ठेवलेली पत्र्याच्या पेटीत ! , 

त्यांना मिळून भरली रद्दी १० किलो (एकदाची)

भंगारवाल्याने काढून नोटा खिशातून 
ठेवली हातावर माझ्या शंभराची एक नोट निवडून 

माझी नजर पडली 
त्याच्या हातातल्या विशिष्ट नोटांवर, 
विचारले मी त्याला 
" काय रे, ह्याही घेतोस का रद्दीत ?" 
तर हसला केविलवाणा, 
म्हणाला 
"नही साब, धंदे में सब जुगाड करना पडता है 
 पेट तो चुहे को भी हर रोज भरना पडता है" 

- श्रीधर जहागिरदार 
नोव्हेंबर २०१६

गुरुवार, ७ मे, २०२०

बोधिवृक्ष


कुठे सापडेल मला बोधीवृक्ष?
मैलोगणती पायपीट करुनही
मनाला कापून काढणारा
हा प्रश्र्न नेमकं काय सुचवतो?
मी नेमकं काय शोधतोय?
कां शोधतोय?
बुद्ध की बोधीवृक्ष?
बुद्ध म्हणून बोधीवृक्ष?
की बोधीवृक्ष म्हणून बुद्ध?
उरात कुऱ्हाड बाळगून
बोधीवृक्ष शोधणारा मी...
मी उरात कुऱ्हाड कां बाळगून असतो?
बोधिवृक्ष कुऱ्हाडीला घाबरत नसणार ...
मलाच कदाचित भय वाटत असणार बोधिवृक्षाचं ...
सापडलाच आणि कुऱ्हाडीच्या दांड्याला
फुटल्या फांद्या बोधिवृक्षाच्या तर?

नाही, मला अंगुलीमाल व्हायचं नाही!!
ती बोधिवृक्षातील धि सुधारुन घेतली,
एवढी ज्ञानप्राप्ति खूप झाली.
- श्रीधर जहागिरदार
७ में २०२०

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

तो जो टपून बसलाय

तो जो टपून बसलाय
तो कावळा आहे की गिधाड
यावरुन ते वाद घालताहेत ...

तो जो टपून बसलाय
तो कावळा आहे की गिधाड हे खुद्द त्यालाही माहीत नाही, मात्र
तो कां आहे हे त्याला पूर्णपणे ज्ञात आहे,

ते जे वाद घालताहेत
ते नेमके कां आहेत हेच त्यांना उमगलेले नाही,
त्यांचे वाद सुरुच असतात.

वाद घालताना ते पुरावे मागतात
तो कावळा असण्याचे किंवा
तो गिधाड असल्याचे,
मग तेच रुप धरुन दाखवतात कावळ्याचे आणि गिधाडाचे
पुरावा म्हणून

तो जो टपून बसलाय
आपले कार्य सिद्ध होताच
तो झेपावतो ....

- श्रीधर जहागिरदार
१० एप्रिल २०२०
(करोना पर्व)

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

गजरा

पहाटे
एकमेकासोबत
गरम वाफाळलेला
चहा घोट घोट,
सोबतीला चिवचिवाट
पहाट चोचीत घेऊन
दिवसाला कवेत घ्यायला
निघायच्या तयारीत असणाऱ्या पाखरांचा ….

संध्याकाळी
थकल्या प्रतीक्षेला माळावा गजरा
मंद गंध मोगऱ्याचा
आणि करावे - व्हावे टवटवीत
असे काहीसे असायचे मनात ….

राहूनच गेले सारे
अधिक महत्वाच्या
ऐहिक सुखांच्या शोधात

- श्रीधर जहागिरदार

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

अटॅक

अटॅक कधीही यायचा
मग आवडती पुस्तके
टिपण वह्या
कविता
मित्रांमध्ये वाटून द्यायचा ...

एकदा तर
एक कविताच
एका मित्राचं नांव लिहून
त्याला दिलेली.
दोघांचं भलं झालं.

आता
पुस्तके नावडती झालीत
वह्या कोरड्या पडल्यात
कविता हरवल्यात

आता अटॅक आला तर
चौकटीतून डोकावणाऱ्या
मित्रांना सांगणार
मलाच चौकटीत ओढून घ्या ...

- श्रीधर जहागिरदार
१८-०२-२०२०

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

मैं किस्सों में बसता हूँ


उलझा उलझा रहता हूँ 
अफवाओं में घुलता हूँ।   

और उछालो जी भर के  
कीचड़ में ही खिलता हूँ।  

आँख कहाँ लगने वाली  
मैं सपनों से डरता हूँ। 

मौत नहीं छू पाएगी   
मैं किस्सों में बसता हूँ। .. 

हमप्यालों से क्या लेना
मैं साकी पे मरता  हूँ।     ..

एक ख़बर ऐसी भी है 
मैं ख़बरों में रहता हूँ।  

देखा उनका नंगापन 
कपडे मैं ही सिलता हूँ।  

उम्मीदों का मालपुआ 
रोज सवेरे तलता हूँ।  

सुनने वाला कोई नहीं        
खुद अपने को छलता हूँ।  

इस महफ़िल में नूर कहाँ   
आतिशीं को तरसता हूँ।  

- श्रीधर जहागिरदार 
१-९-२०१९

मंगळवार, ३० जुलै, २०१९

ओंजळीने पीत आहे


कोण म्हणते भीत आहे 
फक्त म्हटले रीत आहे 

सर्प वेढे केतकीला
जीवघेणी प्रीत आहे 

मोजतो आभाळ उंची
मोजणीला वीत आहे

दाखवा शाळा सुखाची
शोधतो कितवीत आहे
(कां असे दुसरीत आहे?)

राहिला व्याकूळ प्याला 
ओंजळीने पीत आहे 
मर्कटांची नाच गाणी 
श्री पुन्हा गिरवीत आहे 

- श्रीधर जहागिरदार 
३० जुलै २०१९