गुरुवार, २१ मार्च, २०२४

खिडकी

एक खिडकी असते कविता 
आत काय असेल याची उत्सुकता 
चाळवणारी, 
असलाच पडदा तिच्यावर 
तरी अदमास करायला लावणारी.

कविता असते एक खिडकी 
आश्वासक गज लावून 
अंतरंग सुरक्षित ठेवत 
संवाद साधणारी.

कविता एक खिडकी असते 
किलकिली, 
संदर्भ न देता, भिंतीवर टांगलेल्या
तसबीरी दृष्य-अदृष्य करणारी. 

कविता खिडकीत वसते.
खिडकी कवितेत असते.

- श्रीधर जहागिरदार 
२१ मार्च २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा