एक विदुषक माझ्या आतील
सोडत नाही पाठ
असह्य होता उरी वेदना
कणा ठेवतो ताठ.
सुश्रृताच्या हाती देता
देहाची सारंगी
विदुषकाच्या गळ्यात घुमते
धून नवी श्रीरंगी
ग्लानी मध्ये ऐकत असता
मी धीराची वाणी
खुशाल बसतो आत विदुषक
गात पोपटी गाणी.
अविरत चाले वटवट याची
आत कसा हा आला
ओळख पटली विदुषकाची
अंतर्नाद गवसला.
- श्रीधर जहागिरदार