बुधवार, ७ जुलै, २०१०

मोकळा


उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशानं,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधारान।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटान,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही  ह्याच्याच थयथयाटान।

मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या  पेटवल्या ह्या अंबराने   ,
आभाळा एवढ्या चुका देखील 
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने  ...

असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळेल अंबर
आधार होता पांगळ्याचा

उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची 
ही होती नियती, 
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।


येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....


आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)




रविवार, २५ एप्रिल, २०१०

खड़क

बेवारशी लाटांचा उनाड खेळ,
आणि ही अतृप्त संध्याकाळ ...

तुही असायला हवी होतीस खरंतर, 
पण सापडल्या नसतील तुला
पुसल्या गेल्या कालच्या पाउल खुणा..

दोष तुझा नाही ह्या सळसळत्या लाटांचा
सारे काही पुसुनसुध्दा, आयुष्य तर
सुरु आहे म्हणत, मिरवणार् या.....  

मी मात्र खड़क झालोय,

कणाकणान तुटणारा.
पायथ्याशी
त्या संध्याकाळचे सारे रंग एकवटून
काही शिंपले आणि  एक गजरा
कुणा मानिनीच्या केसातून गळलेला......
कधीतरी तर येशीलच तू
पुसल्या गेल्या पाउलखुणांचे भान विसरून
नव्या पाउलखुणा उमटवत,
 तेंव्हा
एक नवाच खड़क आढलेल तुला
लाटांच्या आवेगाने क्लांत झालेल्या तुझ्या
देहाला आसरा देण्यासाठी, तेवढाच
आतुर अन तसाच समंजस!

रविवार, १४ मार्च, २०१०

कैफियत

मान्य, हैराण आहात पाहून
माझ्या डोळ्यातले अथांग शुन्य।
मात्र नाही हे, माझ्या निर्लज्ज
बेछूट, गांजेकसपणाचे पाप
हा तर तुमच्याच दांभिक पाखंण्डाचा शाप!
ज्याची वेळोवेळी दिलीत ग्वाही
ते निलघन आकाश,
खुद्द आहे निरस्तितवान निराश...
पायाखालिल काळी टणक
धरतीच दुभंगलेली,
समाधी कळसांच्या
केशरध्वजांची भंगलेली।
पडसादात उमटती, वारयाचे  निश्वास
इथे तिथे भरलेले शुन्याचे आभास ..





भंग अभंग



मना लागले अंधाराचे खूळ,
व्यथेची चूळ, मुखी असे।

अस्तित्व स्वत:चे दावी वाकुली,
जीर्ण सावली, फक्त हसे।

गळून पड़ती पिकल्या आशा,
पालवे निराशा, निष्पर्णातुन।

सबल तनी वसे खुजावले मन,
जगतो जीवन, मी मरणातुन।

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

भान




मुखी राम नाम, तरी झाला धोका,
आता माझा सखा, सखाराम*।

आजवरी बोल, बोललो सरळ,
ओकीन गरळ, आता सारे।

तत्त्व, मूल्य, निति, सत्यावरी  निष्ठां।
आता तिथे विष्ठा टाकीन मी।

साध्या या जिण्याचे, मोजले मी मोल,
आता कां मी तोल, सावरावा।

आता मी जाणोनी, बांधलासे चंग,
असंगाशी संग, ठेवणार।

सखाराम बाईंडर

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

डार्लिंग




यस डार्लिंग? That's enough?
ठीक आहे।
ओह नो ;
फुटली कांच सांधण्याचा
करू नकोस आटापिटा,
हात रक्ताळतील ते तुझेच
उगाच होइल चौकात बोभाटा।

यस डार्लिंग? ...
डोंट वरी
हळव्या दंवाच्या आयुची
कल्पना आहे मला
I am that much sport
तुझ्या माझ्यातच
राहिल हा मामला।

दयाट्स इनाप्फ़ . .
मात्र विसरु नकोस जाण्याआधी
चेहरयावर फिरवायला पफ ॥

यस दयाट्स सर्टन्ली इनप्फ।

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

परिघ



एकदा सहज विचारल चंद्राला,
अमावस्या- पौर्णिमा, पौर्णिमा- अमावस्या करुन
कंटाळा येत नाही का तुला?
"काय करणार मग ?",
तो उत्तरला:
"काळतोंड्या म्हणुन चिडवतात अवसेला,
कलेकलेने म्हणुन करतो
मी पुनवेचा प्रवास;
वाटतं पुनवेला तरी धन्य पावेन मी ...
पण टिपुर चांदण्यातही दिसतात यांना
फक्त डाग जुन्या अवसेचे,
अन कलंक्या म्हणतात मला।
मावळतिच्या चाकावरुन परत फिरतो
मी अवसेच्या प्रवासाला!"