बुधवार, ७ जुलै, २०१०

मोकळा


उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशानं,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधारान।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटान,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही  ह्याच्याच थयथयाटान।

मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या  पेटवल्या ह्या अंबराने   ,
आभाळा एवढ्या चुका देखील 
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने  ...

असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळेल अंबर
आधार होता पांगळ्याचा

उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची 
ही होती नियती, 
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।


येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....


आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा