सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

तो, ती आणि आकाश


लग्नाआधी दोघेही हातात हात घालून
मोकळ्या आकाशाखाली मुक्त हिंडायचे …
ती ह्याच्या डोळ्यांनी, तो  तिच्या  डोळ्यांनी 
एकच आकाश बघत रंगायचे …

मग दोघांनी ठरवलं
असच किती दिवस फिरायचं ?
वाट बघत बघत तासन तास झुरायचं ?
त्या पेक्षा रहाव, दोघांनी सोबत कायमच…
आकाश मोकळ दिलं सोडून
आणि घेतलं आपल्याला बांधून !

आता ते राहतात कायमचे
एका घरात … 
बघत बसतात 
आपल्या मनात उगवलेल्या
नव्याच भिंतीच्या खिडकीतून
आकाशाचा आपापला तुकडा !


- श्रीधर जहागिरदार

रविवार, २० ऑक्टोबर, २०१३

तमाशा



कुठलीशी तिडीकच उठली …

बेमुर्वत बोललो, वागलो,
पहिल्यांदाच 'घेतल्या' नंतर
वागलो होतो तसा,
तेंव्हाही  उठवले होतेत 
प्रश्नचिन्ह माझ्या स्वतंत्र अस्मितेवर, 
अस्तित्वावर, अभिव्यक्तीवर
अन आता पुन्हा तेच …. 
मधल्या काळात मिळवलेले
सारे पोतेऱ्याने पुसून काढून !
  
अन बसलो  मग
कसनुसा होऊन,
आपलीच नख कुरतडत
आपल्याच दातांनी …।

जे मला अभिप्रेत नसते
ते वर्तनात उमटते
तेव्हाच मी पडतो काळा ठिक्कर
माझ्याच दर्पणात,
खंडीत होते माझेच सौदर्य
माझ्याच हातांनी … !

शोधतोय ती गर्दी मघाची
टाळ्या वाजवून मला चिथावणारी,
निघून गेलेली आता
दुसऱ्या तमाशाला
.
.
माझा तमाशा बनवून !

रविवार, २२ सप्टेंबर, २०१३

अनकही


मैंने कब कहा
बचाओ मुझे मेरी पीड़ा से,
फिर भी चले आते हो तुम
मुझे सम्हालने...

मै रो भी नहीं पाता
रिश्ते के लिहाज से....

आज फिर एक कविता
अनकही रह गई!!

- श्रीधर जहागिरदार

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

सुख प्रवासी प्रवासी


सुख प्रवासी प्रवासी
दु:ख असे रहिवासी …

सुख निरंतर शोध
दु:ख शाश्वताचा बोध …

सुख चौकटी कोंडले
दु:ख गगनी मांडले  …

सुख चांदणी आभास
दु:ख तेजाचा दे ध्यास ...

सुख चिमुट चिमूट
दु:ख पसरे मुकाट …

सुख अळवावर थेंब
दु:ख डोळ्यात ओथंब …

सुख स्वत:शी साठव
दु:ख देवाचा आठव …

- श्रीधर जहागिरदार
२८ आगस्ट २०१३

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

संध्याकाळ - तीन विचार


संध्याकाळ - तीन विचार

सुटणे जुळणे घडते जेथे
तिथे उसवते शिवण मनाची
रुखरुख हुरहुर ग्रासून जाते 
होता संध्याकाळ कुणाची …
दिवस आजचा गेला, सुटला
दान तयाचे उरले हाती,
तेच घेउनी उडेल रावा
कुण्या दिशेला तोडून नाती …
झाली संध्याकाळ पेटवा
पुन्हा नव्याने स्वप्नदिवे,
भेदून कातळ अंधाराचा
मनास फुटू द्या कोंब नवे …


- श्रीधर जहागिरदार
   १-७-२०१३   




शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

घेतला कैवार आहे

गोंधळाला पार आहे
तूच तो आधार आहे  ….

आरसा घेऊन आलो
त्यांत कां तक्रार आहे? ….

थंडशी झाली विधाने
पोळले जिव्हार आहे  …

घेतली लाठी निघाले
मारण्या जो ठार आहे …

पत्थराचा देव होता
घेतला कैवार आहे …

कौतुकाचे ताट मांडा
'श्री' अधाशी फार आहे …

श्रीधर जहागिरदार
१० आगस्ट २०१३

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

हसणे



 

हासता मी भासतो भित्रा ससा
कां कुणाला वाटतो छद्मी असा?

तोंड का वेंगाडता मी हासता
हासणे हा फक्त का तुमचा वसा?

रोज मरते त्यास नां कोणी रडे
हासणे हे मानतो माझा ठसा !

हासणे ओठावरी ना माझ्या जरी
ते बघावे नेत्रात माझ्या राजसा

हासता मी, हासले नाही कुणी
हासण्याचे हो हसे, सांगू कसा …

- श्रीधर जहागिरदार
२ आगस्ट २०१३