१, (उधारीच हसू - रणजीत पराडकर )
रेशीम लडीगत उलगडलेली
एक संवेदनशील यात्रा....
मनात रुजलेल्या हुरहुरीची
उधारीच हसू आणून भरवलेली जत्रा....
सारेच सामील, कधी हिंदोळ्यावर,
कधी पोटात गोळा आणणाऱ्या मेरी गो राउंडवर,
मिटलेल्या डोळ्यांनी,हळुवार,
फिरून आलेले त्या थबकलेल्या क्षणांपर्यंत...
प्रत्येकाच आपल अस एक मोरपीस असतच,
मनाच्या गाभाऱ्यात दडवून ठेवलेलं...
असतच एक नांव, परतणाऱ्या लाटेबरोबर
अथांगतेत वाहून गेलेलं...
असेलही तुझ हसू उधारीच,
पण आमच्या ओठांचे कोपरे दुडपले होते,
आमच्याच आतल्या ओलाव्यान ...
२.
सालाबादाप्रमाणे येणारच पाऊस,
कधी धुमसत,
कधी भिरभिरत,
कधी कोसळत...
त्याला आता माझ्या कौतुक शब्दांनी
बांधत नाही मी.
तू असा, तू तसा, हे सांगायला
मनात एक ढग उमलावा लागतो,
मी तर सारे सूर्यच नाकारून बसलोय
आणि साऱ्या बाष्पाचे झालेत कधीच हिमकण!
मात्र तू बरसलास की चिंब भिजायला
अजून आवडत मला, स्पष्टच सांगतो
'लाईक' च करतो मी, तुझी एकच सर आली तरी,
माझ्या कौतुक शब्दांना तुझ्या सरीची सर नाही रे..
तेव्हा रसप तू बरसत रहा , पसरत रहा
थेंब न थेंब असाच ह्या हिमनगावर!!!
- श्रीधर जहागिरदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा