काही कविता अशा भेटतात
वाचून झाल्या कि खिडकीपाशी
घेऊन जातात,
कवितेचे पुस्तक हातात,
वाचलेल्या कवितेच्या पानावर रुतलेले बोट,
कविता ते सोडायला तयारच नसते...
आत .. खोल .. कांही तरी घडत असते,
नजर दूर ते काही शोधत असते...
अचानक गवसतो दूर-जवळ सांधणारा पूल,
मनावर पांघरलेली जाड झूल
दूर होते; कवितेत रुतलेले बोट सैलावते,
खिडकीत कुठूनशी येऊन बसलेली
चिमणी कौतुकाने माझ्याच कडे पाहत चिवचिवते,
उडून जाते,
माझा नवा ताजा चेहरा पहायला
मी आरशासमोर, तर आरसाच हरवलेला
मला गरज नसल्यासारखा...
- श्रीधर जहागिरदार
3-2-2013
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा