शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१२

प्रवास


Where talents and the needs of the world cross, therein lies your vocation.
 ---Aristotle



(मी वहिवाटसरू..........)

हीच आहें माझी वाट,

असे समजुनी किती तुडवल्या

झिजवून टाचा, मला न कळल्या

त्यांच्या नजरा कौतुक भरल्या...


(मी पळवाटसरू ........)

त्या अंधाऱ्या वाटेवरती,

(कुणी त होते ठेवून पाळत !!)

अनामीकशा भीतीपोटी

धावत होतो धापा टाकत;

रितेपणाचे ओझे ओढत ...


(मी चोरवाटसरू....... )

रितेपणाच्या पोकळीतली

दबे अचानक कळ छोटीशी,

क्षणिक दिसावे ब्रह्मकमळ

वाट उघडता एक छुपीशी;

मनात चमके अति विलक्षण

प्रतिभेची निज वीज लख्खशी !!!


(मी नवी मळवाटसरू ... )

जाणून उमजून

खूप भटकलो मी दरवेशी,

नवलाईच्या नवीन वेशी,

नवीन प्राणी, नवे खेळ अन

नवी माणसे नवीन देशी...


(मी पाऊलवाटसरू ...)

माळरान अन अवकाश ते व्यापक,

खुल्या दिशा आव्हान, न बाधक..


जगताच्या उपयोगा

जिथे भेटली माझी प्रतिभा,

तिथेच फुलली जीवन वृत्ती,

जगणे गाणे, नुरले सक्ती!!


हीच असावी माझी वाट!...

नवी उमेद, नवी पहाट ..

नवीच फुटली पाऊलवाट...

हो, हीच होती माझी वाट....


- श्रीधर जहागिरदार

२१.०९.२०१२



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा