बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

एका फझलकाराची कैफियत.

एकलकोंड्या मनातली माझी एक मजल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

झालो होतो स्वार एकटा, कुणीच नव्हते पाठी
मीच मजला आहें काफी हा खयाल पक्का गाठी...
"पाचा"पेक्षा कमी न चढते, आहें ह्याची खबर
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

लगावली मी त्याला, जो मला आडवा आला,
देणार नाही सूट म्हणाला, सुनावली मी त्याला
बसा यतीला खुशाल जोडत, माझी चाल ढकल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

ठेवला मी अर्थ सलामत, तुमचे दुसरेच हट्ट,
"हुकली वाटे इथे अलामत, बांधणी नाही घट्ट"
किती तुडविले वाळवंट मी, घ्याना त्याची दखल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

वरचा मजला जमीन,  तळमजल्यावर मक्ता
हाजीर नेहमी संदर्भाला बाराखडीचा तक्ता
लघु गुरूच्या पायी बसुनी घेईल थोडी अकल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

तुमची ती जालीम कतरिना, अशी हासील-ए-गझल,
माझी विद्या ग्रहण करीना, म्हणून म्हणता फझल
जरा बसू द्या कोपऱ्यात ती करेल तुमची नकल,
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

- श्रीधर जहागिरदार
१८-०९-२०१२
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा