शुक्रवार, १३ मार्च, २०१५

प्रवास



अनेक प्रवास केलेत
एकमेकाच्या संगतीने

भर दुपारी
तुडवत उष्ण वाळवंटे भारलेली मृगजळाने
अन्यमनस्क मनाने, चिर-तृषिता सारखे ...

कधी संध्याकाळी
हातात हात वगैरे गुंफून ओल्या वाळूवर
पाठ्य पुस्तकातले धडे गिरवल्या सारखे …

रात्री बेरात्री
वासनांच्या लाटेवर विरघळत, निथळत
सत्कृतदर्शनी मिठीत हरवल्या सारखे ...

उद्या पहाटे
निघुयात का नदी काठी, देवळाच्या दिशेने
असंग विरक्त धवल वगैरे मनाने, नव्या प्रवासाला?

- श्रीधर जहागिरदार
१३ मार्च २०१५

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

वागणे

तुझे वागणे हे कुणा सारखे ?
तगे वादळी त्या तृणा सारखे ...

तिने सोडली ना कधी पायरी
तुम्ही वागला ते हुणा सारखे …

गुन्हेगार येथे मिळावे कसे
शहाजोग पुसती खुणा सारखे  …

जिण्याचे न सौदे जमावे मला
अखेरास लेणे गुणा सारखे ….

जपावे खयालास मतल्यातल्या
नव्यानेच रुजल्या भ्रुणा सारखे

- श्रीधर जहागिरदार
०५-०२-२०१५

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

रस्ता भिकार आहे


गाणे टुकार आहे
श्रोता शिकार आहे

चालीत रेकण्याचा
भलता प्रकार आहे

सुरताल सोडण्याचा
ह्याला विकार आहे

आलाप पेलण्याला
ह्याचा नकार आहे

ज्ञानात शून्य, ह्याला
गुर्मी चिकार आहे

पडतो पिऊन, म्हणतो
रस्ता भिकार आहे

कोणी म्हणोत काही
'श्री' निर्विकार आहे

- श्रीधर जहागिरदार
०१-०२-२०१५

तेच तेच


रोज रोज तेच तेच
जीवनाची रश्शी खेच …

उठा उठा गिळा गिळा
इथे तिथे पळा पळा...

रहा उभे, तिथे बसा
दाखव कुठे तुझा ठसा....

सवयीची मुका मुकी
नसते झेंगट फुका फुकी....

हेच हेच रोज रोज
किती उरे मोज मोज....

जीव तगे कसा बसा
तरी म्हणे हसा हसा...

श्रीधर जहागिरदार
३१-०१-२०१५

शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

फुलांचे दिलासे


इथे काळजाला घरे आजही
तुझे चाललेले बरे आजही ....

फुलांचे दिलासे असू दे तुला
इथे वेदनांचे झरे आजही….

जरी सत्य होते जगा ज्ञातसे
पुरावेच ठरती खरे आजही …

किती बोललो, हासलो केवढे
कुठे मौनलो ते स्मरे आजही ….

असे भेटलो, काय सांगू सखे
पहा …चंद्र डोही तरे आजही …

तनी कंटकाचाच शेला जरी
उरातील जपले गरे आजही ...

पुन्हा सैल केलास संभार तू !
जगू दे जरा, 'श्री' मरे आजही …

- श्रीधर जहागिरदार
२४ - ०१ - २०१५

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

तो पाऊस खिशात घेऊन उंडारायचा



 जयंत (विद्वांस) राव
शप्पत सांगतो
तो पाऊस खिशात घेऊन उंडारायचा,
वाऱ्यावर स्वार होऊन फिरायचा,
डोंगर माथ्याला गुदगुली करायचा
कधी खोल दरीत सूर मारायचा..

उंच झाडांची शेंडी ओढताना
पाहिलंय मी त्याला,
विमानांची बोट करताना
साहिलंय त्याला,

सूर्याला झाकताना
स्वत:च काजळायचा,
लपंडावात चांदणी समोर
चंद्राला उघडा पाडायचा...

कसले कसले आकार धारायचा,
ओळखू बघू जाता खुशाल फिरायचा !
सख्खा मित्र याचा वारा
अभिमान त्याला "मै आवारा"...

अखेर तेच झाल, हरवून बसला
कुठेतरी पाऊस खिशातला !!
शोधतोय आता
भर पावसाळ्यात त्याला..

कालच पाहिले त्याने खिडकीतून,
तुमच्या घरात दिसला पाऊस,
मुसमुसताना तुमच्यासमोर ...दिलात आसरा,
हळवेपण जपण्याची
कवी मनाला भलतीच हौस!!

आता रित्या खिशाने कसे जावे याने
रानात, वनात, कवीच्या मनात,
शेतात, मळ्यात, गायकाच्या गळ्यात?

झोपलाय म्हणता तर झोपू दे जरा
पण उठण्या आधीच अलगद त्याला
ठेवा परत याच्या खिशात...

पावसाविना ढग राहील कसा,
चमकत्या विजेला भिडेल कसा?

- श्रीधर जहागिरदार

रसप (मला हात धरून पुन: लिहीत करणारा मित्र )



१, (उधारीच हसू - रणजीत पराडकर )
रेशीम लडीगत उलगडलेली
एक संवेदनशील यात्रा....
मनात रुजलेल्या हुरहुरीची
उधारीच हसू आणून भरवलेली जत्रा....

सारेच सामील, कधी हिंदोळ्यावर,
कधी पोटात गोळा आणणाऱ्या मेरी गो राउंडवर,
मिटलेल्या डोळ्यांनी,हळुवार,
फिरून आलेले त्या थबकलेल्या क्षणांपर्यंत...
प्रत्येकाच आपल अस एक मोरपीस असतच,
मनाच्या गाभाऱ्यात दडवून ठेवलेलं...
असतच एक नांव, परतणाऱ्या लाटेबरोबर
अथांगतेत वाहून गेलेलं...

असेलही तुझ हसू उधारीच,
पण आमच्या ओठांचे कोपरे दुडपले होते,
आमच्याच आतल्या ओलाव्यान ...

२.
सालाबादाप्रमाणे येणारच पाऊस,
कधी धुमसत,
कधी भिरभिरत,
कधी कोसळत...

त्याला आता माझ्या कौतुक शब्दांनी
बांधत नाही मी.
तू असा, तू तसा, हे सांगायला
मनात एक ढग उमलावा लागतो,
मी तर सारे सूर्यच  नाकारून बसलोय
आणि साऱ्या बाष्पाचे झालेत कधीच हिमकण!

मात्र  तू बरसलास की चिंब भिजायला
अजून आवडत मला, स्पष्टच सांगतो
'लाईक' च  करतो मी, तुझी एकच  सर आली तरी,
माझ्या कौतुक शब्दांना तुझ्या सरीची सर नाही रे..
तेव्हा रसप तू बरसत रहा , पसरत  रहा
थेंब न थेंब असाच ह्या हिमनगावर!!!

- श्रीधर  जहागिरदार