शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

भीड़

 
आदमी का चेहरा
घुलता जा रहा है
एक भीड़ में ...
आदमखोर भीड़ में …
.
.
.
कुछ दोस्तों को खो चुका  हूँ
.
.
.
डरता हूँ
कहीं मैं भी .... 

.
.
बस अपने
नाखून काट लेता हूँ,
सुबह शाम ... 


नहीं बनना चाहता 
मैं किसी तरह 
किसी ख़बर का हिस्सा !!

- श्रीधर जहागिरदार 

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५


सालाबादाप्रमाणे येणारच पाऊस,
कधी धुमसत, कधी भिरभिरत, कधी कोसळत...

त्याला आता माझ्या कौतुक शब्दांनी 
बांधत नाही मी.
तू असा, तू तसा, हे सांगायला
मनात एक ढग उमलावा लागतो,
मी तर सारे सूर्यच  नाकारून बसलोय 
आणि साऱ्या बाष्पाचे झालेत कधीच हिमकण!

मात्र  तू बरसलास की चिंब भिजायला 
अजून आवडत मला, स्पष्टच सांगतो
'लाईक' च  करतो मी, तुझी एकच  सर आली तरी,
माझ्या कौतुक शब्दांना तुझ्या सरीची सर नाही रे..
तेव्हा रसप तू बरसत रहा , पसरत  रहा 
थेंब न थेंब असाच ह्या हिमनगावर!!!
- श्रीधर  


दोन काठ


नाकारताना ठाऊक असतं
असलेली पोकळी रितीच असणार
पुढेही;
पण "असेल अजून चांगले"
ह्या आशेचे स्पंदन चालू ठेवतात शोध …
एका क्षणी स्वीकारतोच आपण
मिळते ते,वाटते
भरली आता पोकळी … पण
पुढच्याच क्षणी ग्रासते भीती
'अजून चांगल्याची' वाट बंद झाल्याने
थांबलेल्या प्रवासाची !!
.
.
आशा आणि भीती
दोन काठाच्या मधला
हा खळखळाट …।
- श्रीधर जहागिरदार 
१४ जुलै २०१५

शुक्रवार, ३ जुलै, २०१५

जाळी

जाळीत जाळीत जाती
जपलेली पिंपळ पाने…
भिरभिर त्यातून वारा
गाई सांगाड्याचे  गाणे  …
चर् चर् पायाखाली
कण्हते पानगळीचे पान 
विझलेल्या फांदीत रुजावे
मग हिरवळलेले स्वप्न …
क्षणाक्षणाला मरणे अन
क्षणाक्षणातून जनने 
चिरंतनाचे सुरु राहते
निर्मळ झुळझुळ गाणे … 

- श्रीधर जहागिरदार
१८-०२-२०१५

सोमवार, २२ जून, २०१५

शब्द


 शब्द
***********
लिहिलेले शब्द,
पांढऱ्यावर काळे नसते,
असतात ते मेघ, आकाश व्यापलेले
कधी त्यांच्या उदरात सामावलेली
आर्द्रता समजून घे
आणि विरघळू दे स्वत:लाही नि:संकोचपणे …


 शब्द उद्गारलेले
नसतात वाऱ्यात सोडलेल्या लहरी,
सामावलेली असतात त्यात वादळे
मनातल्या अव्यक्त उद्रेकाची,
कधी तरी कानोसा घे
आणि भिड त्याला समोरा समोर …

अव्यक्त शब्दातली निरवता
तुझी सोय नसते, मुक्त व्यक्त होण्यासाठी
त्यातली दाहकता न विझवता
ऐक त्यातली आर्तता आणि दे हाक ….

अविरत चालणाऱ्या ह्या काल-वाहनात
करत आहोत प्रवास शेजारी बसून, तर
जोडून घेना नाते, मनाचे मनाशी …

२१ जून २०१५

गालगुच्चा


"तुझ्या कविता ऐकायला येतेय", असा 
तुझा निरोप आला कि मला हसूच यायचं
कारण तुझा आणि कवितेचा बादरायण संबंध नाही
हे मला ठाऊक होत
यायचीस आणि म्हणायचीस,
"चल  वही वगैरे काढून ठेव, तोवर मी भजी करायला घेते"
सारी तयारी बरोबर घेऊन आलेली असायचीस तू.
मी मनापासून वाचायचो कविता तुझ्यासाठी
एका पाठोपाठ एक …
मधून मधून भजी आणि वाफाळलेली कॉफी
तू मधून मधून दाद द्यायचीस
"वा ", " काय कल्पना आहे, पुन्हा वाच" …
"काय समजल ग तुला ह्या कवितेतल ?"
मी विचारल होत एकदा
तर म्हणालीस, "तू समजलास, तेव्हढी समज खूप झाली"
.
.
निरोपाच्या वेळी कवितांची वही तुला देऊ केली
तर म्हणालीस, "नको, कवितांचा गालगुच्चा नाही घेता येत !"
त्या नंतर त्या वहीतल्या कविता वाचल्या नाहीत,
 कधीच, कुठेही
कांद्याच्या भज्यांनाही कवितेची चव आली नाही कधी !!
- श्रीधर जहागिरदार

रविवार, १७ मे, २०१५

जिद्द

जिद्द

जंगल कापली जाताहेत
त्याच्या दशपटींनी
त्याच वेळी उगवताहेत
आपल्या आतील श्वापदांसह
माणसांच्या मनात ….
शीळ हरवलेली पांखरे
कावरी बावरी फडफडताहेत
निलाजऱ्या गिधाडांच्या छायेत
सूर्याचा शोध त्यांचा
वाटतोय संपुष्टात आलेला….

अवखळपणा विसरून
वाहते झरे स्तब्ध झालेत,
कोरड्या पडलेल्या तळाशी
साचू लागलाय फक्त गाळ,
वातावरणातला ….

तरी लक्ष वेधून घेतो
कातळातून  डोकावणारा
एक तृणांकुर,
जिद्दीने श्वास घेऊ पाहणारा ….  

- श्रीधर जहागिरदार
१७ मे २०१५