सोमवार, ७ एप्रिल, २०१४

दिशाहीन


उध्वस्त क्षितीज, अन सूर्य दिशाहीन,
आकाश  स्वच्छ नाही, पुरतेच ते मलीन.

साम्राज्य सावल्यांचे, कळसूत्री बाहुल्यांचे
तुटतील दोर आणि होईल फक्त लीन!

असतात भोवताली,चालूच हालचाली,
साऱ्यात मात्र स्तब्ध, मी एकटाच दीन! 

श्वासांची फक्त ग्वाही, जगलो कधीच नाही,
हाती कधी फुलेना, कांटेही  दंशहीन!

हातात फक्त लुळे, उरलेत शब्द खुळे,
त्यांना कुठे किनारा, झालेत अर्थहीन !    

- श्रीधर जहागिरदार (१९७२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा