मधुमास तुझे सरले आता, सरू दे,
'मधु' मुरला ग रक्ती माझ्या, मुरु दे ...
**
सळसळ माझी रक्तामधली शमली,
रक्त दाब मग तुला कशाने, कळू दे...
**
"तुझ्या कुंतली झरे चांदणे.." म्हणता
"चांद उगवला तुझ्याही माथी", म्हणते..
**
तुझ्या विभ्रमी रमलो श्रम ना दिसले,
विसाव आता पाय जरा मज चुरू दे..
**
"वहीतला तो गुलाब सुकला, कुठला??"
"साभार" तुझी कविता कुठली! कळू दे.!!"
**
"सो.ड.. हात ना .. भवती सारे.. " ...स्मरते?
"किती ग गर्दी...!!" "हात तुझा मज धरू दे.."
**
जिंकलो किती डाव एकटा, खुपते
अता जिंक तू, मला एकदा हरू दे.
**
दोन आपली पिले बोलवी दोघा
चिमणा कोठे, कोठे चिमणी, ठरू दे..
- श्रीधर जहागिरदार
१९-१०-२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा