शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

मी लिहितो माझ्यासाठी


मी लिहितो माझ्यासाठी ,
कां बाळगू नसत्या गाठी?

सहज भावना शब्दामधुनी
कशास त्यांना दावू काठी?

असेल चुकले कधी व्याकरण
म्हणून वागती जसे तलाठी!

अर्थ न चुकला, हे खरे ना?

कशास पडता उगाच पाठी?

नियमाने ना भाषा बनली
भाषा आधी, नियम ते पाठी..

असाल तुम्ही शास्त्री पंडित
तुम्ही जपावी तुमची आठी!

- श्रीधर जहागिरदार

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१२

प्रवास


Where talents and the needs of the world cross, therein lies your vocation.
 ---Aristotle



(मी वहिवाटसरू..........)

हीच आहें माझी वाट,

असे समजुनी किती तुडवल्या

झिजवून टाचा, मला न कळल्या

त्यांच्या नजरा कौतुक भरल्या...


(मी पळवाटसरू ........)

त्या अंधाऱ्या वाटेवरती,

(कुणी त होते ठेवून पाळत !!)

अनामीकशा भीतीपोटी

धावत होतो धापा टाकत;

रितेपणाचे ओझे ओढत ...


(मी चोरवाटसरू....... )

रितेपणाच्या पोकळीतली

दबे अचानक कळ छोटीशी,

क्षणिक दिसावे ब्रह्मकमळ

वाट उघडता एक छुपीशी;

मनात चमके अति विलक्षण

प्रतिभेची निज वीज लख्खशी !!!


(मी नवी मळवाटसरू ... )

जाणून उमजून

खूप भटकलो मी दरवेशी,

नवलाईच्या नवीन वेशी,

नवीन प्राणी, नवे खेळ अन

नवी माणसे नवीन देशी...


(मी पाऊलवाटसरू ...)

माळरान अन अवकाश ते व्यापक,

खुल्या दिशा आव्हान, न बाधक..


जगताच्या उपयोगा

जिथे भेटली माझी प्रतिभा,

तिथेच फुलली जीवन वृत्ती,

जगणे गाणे, नुरले सक्ती!!


हीच असावी माझी वाट!...

नवी उमेद, नवी पहाट ..

नवीच फुटली पाऊलवाट...

हो, हीच होती माझी वाट....


- श्रीधर जहागिरदार

२१.०९.२०१२



बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

एका फझलकाराची कैफियत.

एकलकोंड्या मनातली माझी एक मजल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

झालो होतो स्वार एकटा, कुणीच नव्हते पाठी
मीच मजला आहें काफी हा खयाल पक्का गाठी...
"पाचा"पेक्षा कमी न चढते, आहें ह्याची खबर
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

लगावली मी त्याला, जो मला आडवा आला,
देणार नाही सूट म्हणाला, सुनावली मी त्याला
बसा यतीला खुशाल जोडत, माझी चाल ढकल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

ठेवला मी अर्थ सलामत, तुमचे दुसरेच हट्ट,
"हुकली वाटे इथे अलामत, बांधणी नाही घट्ट"
किती तुडविले वाळवंट मी, घ्याना त्याची दखल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

वरचा मजला जमीन,  तळमजल्यावर मक्ता
हाजीर नेहमी संदर्भाला बाराखडीचा तक्ता
लघु गुरूच्या पायी बसुनी घेईल थोडी अकल
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

तुमची ती जालीम कतरिना, अशी हासील-ए-गझल,
माझी विद्या ग्रहण करीना, म्हणून म्हणता फझल
जरा बसू द्या कोपऱ्यात ती करेल तुमची नकल,
म्हणोत कोणी काहीही, माझी हीच गझल ...

- श्रीधर जहागिरदार
१८-०९-२०१२
 

रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

सरळ वाटही वळते हल्ली

सरळ वाटही वळते हल्ली,
काम काढणे जमते हल्ली... 

कशास करता गद्धे मजुरी 
मस्का पालिश फळते हल्ली...  

झक्क करावा प्रकल्प सादर  
गती कुणी ना पुसते हल्ली.. 

संध्याकाळी शुभंकरोती ?
जीभ कोरडी पडते हल्ली...  

कुत्रे होवुन जावे तेथे 
जिथे आंधळे दळते हल्ली...

संघ भावना विचार रुचकर 
भिडू पुढे? मळमळते हल्ली... 

लज्जा स्त्रीचा खरा दागिना    
सहज कुणीही लुटते  हल्ली ... 

बरे चालले म्हणतो 'श्री', पण 
झोप तयाला नसते हल्ली. ..

- श्रीधर जहागिरदार 
१६-०९-२०१२ 


मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

साठोत्तरी

१.
चषक किती उंचावून केले,
हुर्र्रे हुर्र्रे ह्या जगण्याला,
कलंडलेली सुरई तिरकी
नुरली मदिरा ते भरण्याला ...

२.
उडलेल्या वा पिकल्या केसांना,
सुरईची उलगडली वळणे,
देशी किंवा परदेशी, असुदे
आकर्षक, आता कुठले चळणे...

३.
असु दे पेला हातामध्ये, मद्य बदल तू,
'नाद' असू दे, गाण्यामधले शब्द बदल तू,
सुरावटीला तू वेळेची, जाण असू दे ,
विझतानाही अंगाराची आण असू दे!

- श्रीधर जहागिरदार

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

बोलतो आपण अता


बोलतो आपण अता, पण तरी ना बोलतो, 
बोलण्या आधीच कां, शब्द सारे तोलतो? 

ते दिवस होते असे, गंध केवळ माळला,
माळण्या आधी अता पाकळ्या कां मोजतो?

नम्रता,हास्य, सुवदन, आभूषणे मानली 
काय होते येत सत्ता, कोण त्यांना लाटतो?

वागण्याचे स्वातंत्र्य दोघांसही भावले 
हासण्याचेही खुलासे कां अता मागतो? 

मान्य आहें येथ सारे व्यवस्थित वाटते
विस्थापिता सारखा कां तरी "श्री" वागतो?

- श्रीधर जहागिरदार 
१-९-२०१२